नागपूर विद्यापीठ; परीक्षा हुकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना अखेरची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 08:18 PM2022-04-13T20:18:06+5:302022-04-13T20:18:32+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परत एक संधी देण्यात येणार आहे. २५ एप्रिल रोजी ५० हून अधिक अभ्यासक्रमांच्या पहिल्या व तिसऱ्या सत्राच्या ऑनलाइन फेरपरीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परत एक संधी देण्यात येणार आहे. २५ एप्रिल रोजी ५० हून अधिक अभ्यासक्रमांच्या पहिल्या व तिसऱ्या सत्राच्या ऑनलाइन फेरपरीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे परीक्षा हुकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ऑनलाइन परीक्षेदरम्यान विविध तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेकांना पेपर देता आले नाही. काहींचे पेपर आपोआपच सबमिट झाले, तर अनेकांचे पेपर योग्य पद्धतीने सबमिटच झाले नाहीत. शिवाय अनेकांना तर नेटवर्क उपलब्ध नसल्याने पेपरच देता आले नाही. पेपर हुकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी होत होती. अखेर यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी परिपत्रक जारी केले आहे. यानुसार २५ एप्रिल रोजी विविध विषयांच्या परीक्षा घेण्यात येतील. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी २० एप्रिलपर्यंत महाविद्यालयात तक्रार दाखल करावी, तसेच प्राचार्यांनी महाविद्यालयाच्या लॉगिनमधून ती तक्रार विद्यापीठाला पाठवावी. तरच विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल, असे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले.
२५ एप्रिल :
एम.ए-प्रथम सत्र (इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, भूगोल, समाजशास्त्र, पर्शिअन, संस्कृत, पाली, डॉ.आंबेडकर विचारधारा, गांधी विचारधारा, गृह अर्थशास्त्र, बुद्धिस्ट स्टडीज, तत्वज्ञान, मानसशास्त्र, जनसंवाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स-तृतीय सत्र), एमएफए-प्रथम सत्र, एमसीएम-प्रथम सत्र, एमकॉम-प्रथम सत्र, एमएस्सी-प्रथम सत्र (सर्व विषय), एमटेक-प्रथम सत्र.
२६ एप्रिल :
एमसीए-प्रथम सत्र, बीटेक-प्रथम सत्र, बीई-प्रथम सत्र, एमबीए-प्रथम सत्र, बीफार्म-प्रथम सत्र, एलएलएम-प्रथम सत्र.