नागपूर विद्यापीठ : निवडणुकांमुळे परीक्षांना बसणार फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 08:55 PM2019-03-11T20:55:42+5:302019-03-11T20:57:02+5:30
लोकसभा निवडणुकांचा मुहूर्त जाहीर झाला असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जागांवर ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांच्या दरम्यानच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून मतदानाच्या दिवशीचे पेपर पुढे ढकलण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकांचा मुहूर्त जाहीर झाला असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जागांवर ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांच्या दरम्यानच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून मतदानाच्या दिवशीचे पेपर पुढे ढकलण्यात येणार आहेत.
लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदान केंद्र म्हणून साधारणत: निवडणूक आयोगाकडून शाळा, महाविद्यालये अधिग्रहित करण्यात येतात. केवळ मतदानाचा दिवसच नाही तर त्याअगोदरचे तीन दिवस व नंतरचे दोन दिवसदेखील तेथे निवडणुकांचे काम सुरू असते. यात मतदानाची तयारी, कर्मचाऱ्यांची व्यवस्था, सुरक्षाव्यवस्थेची आखणी तसेच मतदानानंतरचे सोपस्कार यांचा समावेश असतो. दरम्यान, नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना २७ फेब्रुवारीपासूनच सुरुवात झाली आहे. शिवाय पुढील आठवड्यात पदवीच्या परीक्षांनादेखील सुरुवात होणार आहे. काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा नेमक्या ११ एप्रिल रोजीच आल्या आहेत. अद्याप निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्र नेमकी कुठली राहतील याची कुठलीही यादी आलेली नाही. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होण्यापेक्षा विद्यापीठाने वेळापत्रकांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सद्यस्थितीत ७२ पेपर ‘पोस्टपोन’ करण्यात आले आहेत. या पेपर्सचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, असे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी सांगितले.
इतर तारखांचे काय ?
विद्यापीठाने ११ एप्रिल रोजीच्या परीक्षा समोर ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मतदान केंद्र हे दोन ते तीन दिवस अगोदरच अधिग्रहित करण्यात येतात. अशा स्थितीत त्या केंद्रांवर अगोदर घोषित वेळापत्रकाप्रमाणे या कालावधीत परीक्षा येत असेल तर मग काय करावे यावर विद्यापीठात मंथन सुरू आहे.
निवडणुकांना पूर्ण सहकार्य
विद्यापीठाच्या परीक्षा जरी मतदानाच्या कालावधीत येत असल्या तरी निवडणुका होणेदेखील तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्यात येईल. सद्यस्थितीत आम्ही ११ एप्रिल रोजीचे पेपर समोर ढकलले आहेत. इतर तारखांबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ. विद्यार्थ्यांना गैरसोय होणार नाही याचीदेखील काळजी घेण्यात येईल असे मत डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केले.