नागपूर विद्यापीठ : नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचे ‘टार्गेट’ १३ डिसेंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:17 PM2018-09-07T12:17:22+5:302018-09-07T12:18:03+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम १३ डिसेंबर अगोदर पूर्ण झाले नाही तर कंत्राटदाराला दिवसाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होणार असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. मागील काही काळापासून बांधकामाने वेग घेतला असल्याचे दावे करण्यात येत असले तरी प्रशासनाने कंत्राटदाराला १३ डिसेंबर अगोदर हे काम पूर्ण करण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे. जर वेळेत काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदाराला दिवसाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे.
‘कॅम्पस’जवळील ४४ एकर मोकळ्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी बजाज समूहातर्फे ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) अंतर्गत १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २६ सप्टेंबर २०१५ रोजी याचे भूमिपूजन पार पडले.
यावेळी राहुल बजाज यांनी हे काम दोन वर्षांत पूर्ण व्हायला हवे व १ आॅक्टोबरपासून याचे ‘काऊंटडाऊन’ सुरू होईल असे प्रतिपादन केले होते. तर ही ‘स्मार्ट’ व ‘ग्रीन’ इमारत पेपरलेस असेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती.
या समारंभानंतर वर्षभर तर येथे काहीच काम झाले नाही. विद्यापीठाने विविध प्रशासकीय अडचणी दूर करुन निविदी प्रक्रिया राबविली होती. यात ३ निविदा आल्या होत्या व सर्व निकष पूर्ण करणाऱ्या नागपूरातील एका कंपनीला कंत्राट देण्याचा निर्णय झाला. कंत्राटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरदेखील काम सुरू झाले नव्हते.
२०१६ या वर्षाच्या अखेरीस महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यावेळी २०१८ चे ‘टार्गेट’ प्रशासनाने ठेवले होते. सद्यस्थितीत या इमारतीचा ढाचा उभा झाला आहे व ‘टाईल्स’ वगैरेदेखील लावण्याचे काम सुरु आहे. विद्युत, ‘प्लंबिंग’ तसेच रंगरंगोटीचे काम १३ डिसेंबरपर्यंत पूर्ण झाले पाहिजे, असे आम्ही कंत्राटदाराला सांगितले असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.
कुलगुरू निवासस्थानाशी थेट जोडली जाणार इमारत
नवीन प्रशासकीय इमारत ही कुलगुरू निवासस्थानाच्या अगदी जवळ आहे. या इमारतीपासून ते कुलगुरू निवासस्थानापर्यंत सिमेंटचा अंतर्गत मार्ग बनविण्यात येईल. त्यामुळे कुलगुरूंना थेट पायीदेखील कार्यालयात येता येणार आहे, असे डॉ.काणे यांनी सांगितले.
बजाज यांची मुदत केव्हाच संपली
१० सप्टेंबर २०१६ पासून या इमारतीच्या बांधकामाचे ‘काऊंटडाऊन’ प्रशासनाने सुरू केले. प्रत्यक्षात २०१५ सालच्या १ आॅक्टोबरपासूनच याचे ‘काऊंटडाऊन’ सुरू होणार होते. तसे कुलगुरूंनी जाहीरपणे सांगितले होते. परंतु प्रशासकीय उदासीनता व विविध अडथळे यांच्यामुळे हे काम वर्षभर उशिराने सुरू झाले होते. दरम्यान या इमारतीच्या कोनशीला समारंभाला जवळपास तीन वर्ष होत आहेत. बजाज यांनी २ वर्षांत इमारत पूर्ण करण्यात यावी, असे सांगितले होते. मात्र त्यांची मुदत कधीच संपली आहे.