नागपूर विद्यापीठ : परीक्षांसाठी तयार करावे लागतील नवे पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 12:06 AM2020-05-09T00:06:22+5:302020-05-09T00:10:50+5:30
कोरोना प्रादुर्भावामुळे केवळ अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्याच परीक्षा घेण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. परंतु या निर्णयामुळे विद्यापीठांची धावपळ होणार आहे. परीक्षेची प्रणाली बदलणार असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नव्याने सर्व पेपर ‘सेट’ करावे लागणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे केवळ अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्याच परीक्षा घेण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. परंतु या निर्णयामुळे विद्यापीठांची धावपळ होणार आहे. परीक्षेची प्रणाली बदलणार असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नव्याने सर्व पेपर ‘सेट’ करावे लागणार आहेत. शिवाय परीक्षा केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे अनिवार्य असेल. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्यादेखील त्या हिशेबाने वाढवावी लागणार आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील विद्यापीठ परीक्षांसंदर्भात शुक्रवारी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केवळ अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्याच परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा जुलै महिन्यात घ्यायच्या आहेत तर कुठल्याही परिस्थितीत निकाल १५ ऑगस्टपर्यंत जाहीर करायचे आहेत.
उन्हाळी परीक्षांचे सर्व पेपर अगोदरच ‘सेट’ झाले होते. परंतु आता परीक्षा या तीन तासांऐवजी दोन तासांच्या असतील. त्यामुळे साहजिकच नव्याने पेपर ‘सेट’ करावे लागणार आहेत. ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी लागणार आहे. शिवाय एकाच महिन्यात इतक्या साºया परीक्षा घ्यायच्या असल्यामुळे संपूर्ण नियोजन या महिन्यातच तयार करावे लागणार आहे.
परीक्षा केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळायचे आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात परीक्षा केंद्र निश्चित करणे अनिवार्य आहे. यादृष्टीने विद्यापीठाकडून सोमवारपासूनच पावले उचलण्यात येतील, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.
प्राधिकरणांची मंजुरी आवश्यक
राज्य शासनाचे अद्याप लिखित निर्देश आलेले नाहीत. परंतु परीक्षांचा कालावधी तीनऐवजी दोन तासाचा असेल अशी सूचना करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठात असे करण्यासाठी विद्वत्त परिषदेची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यानंतर परीक्षा मंडळाच्या बैठकीतदेखील परीक्षा प्रणालीबाबत मंजुरी घ्यावी लागेल. जुलै महिन्यात परीक्षा घ्यायच्या असल्याने युध्दपातळीवर ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.