नागपूर विद्यापीठ : पुढील वर्षी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम होणार ‘अपडेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 09:36 PM2018-10-10T21:36:06+5:302018-10-10T21:39:52+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून ‘अपडेट’ करण्यात येणार आहे. ‘एआयसीटीई’च्या (आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) निर्देशांचे विद्यापीठ पालन करणार आहे. विद्यापीठात ‘मॉडेल’ अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी नियमावली तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून अभ्यास मंडळांसमोर हा प्रस्ताव मांडण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून ‘अपडेट’ करण्यात येणार आहे. ‘एआयसीटीई’च्या (आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) निर्देशांचे विद्यापीठ पालन करणार आहे. विद्यापीठात ‘मॉडेल’ अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी नियमावली तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून अभ्यास मंडळांसमोर हा प्रस्ताव मांडण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.
देशभरात एकच गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणाली लागू करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गतच ‘एआयसीटीई’ने पदवी, पदव्युत्तर अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रम ‘अपडेट’ करणे आणि नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल घडविण्याकरिता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सहा प्रमुख अभियांत्रिकी शाखांसाठी देशातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञांची समिती गठित केली होती. नवा अभ्यासक्रम तयार करण्यापूर्वी औद्योगिक-शैक्षणिक तज्ज्ञ, माजी विद्यार्थी तसेच संशोधन क्षेत्रातील शास्त्रज्ञांच्या सूचना ेविचारात घेण्यात आल्या.
अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ‘मॉडेल’ अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात बुधवारी झालेल्या विद्वत् परिषदेत डॉ.राजेश पांडे यांनी प्रस्ताव मांडला. त्यानंतर या मुद्यावर चर्चा झाली. नागपूर विद्यापीठाने यासंदर्भात अगोदरच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी नियमावलीदेखील तयार करण्यात येत आहे. अभ्यास मंडळासमोर हा प्रस्ताव मांडण्यात येईल व पुढील शैक्षणिक सत्रापासून ‘मॉडेल’ अभ्यासक्रम लागू करण्यात येईल, अशी माहिती डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.
२० टक्के अभ्यासक्रम विद्यापीठ ठरविणार
‘एआयसीटीई’ने उपलब्ध करुन दिलेला सर्व ‘मॉडेल’ अभ्यासक्रम लागू करणे अनिवार्य नाही. ८० टक्के अभ्यासक्रम ‘एआयसीटीई’चा व २० टक्के अभ्यासक्रम विद्यापीठाच्या पातळीवर तयार केलेला राहील. ‘एआयसीटीई’ने तशी सूटच दिली असल्याची माहिती डॉ.काणे यांनी दिली.
‘मॉडेल’ अभ्यासक्रमाची विशेषता
- ‘इंडक्शन प्रोग्राम’चा अभ्यासक्रमात राहणार समावेश
- संशोधन व नवनिर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या घटकांचा समावेश
- विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राची नेमकी आवश्यकता व कार्यप्रणाली कळावी यादृष्टीने अभ्यासक्रमाची रचना
- भारताचे संविधान, पर्यावरण विज्ञान-तंत्रज्ञान, भारताचे पारंपारिक ज्ञान यांचा अभ्यासक्रमात समावेश
- ‘मॉडेल’ अभ्यासक्रमात ‘व्हर्च्युअल’ प्रयोगशाळांना स्थान
- अभ्यासक्रमात उद्योजकतेवर आधारित विषयांचा समावेश.
- अभ्यासक्रमाचे नियमित कालावधीने नूतनीकरण
कौशल्यावर जास्तीत जास्त भर
नवे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आधुनिकता, अद्ययावत तंत्रज्ञानाचे शिक्षण तसेच नाविन्यपूर्ण कौशल्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने तयार केले आहेत. या अभ्यासक्रमात प्रगत माहिती व तंत्रज्ञानाला स्थान असल्याने तो जागतिक पातळीवर सर्वमान्य ठरणारा असेल. आदर्श अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट तयार करताना भविष्यात आवश्यक विषय तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पातळी आणि कौशल्यावर भर देण्यात आला आहे. यात आवश्यक व सोबतच वैकल्पिक विषयांसोबत प्रयोगशाळा प्रात्यक्षिकांची जोड देण्यात आली आहे. संशोधनातून बौद्धिक ज्ञानसंपदा तसेच ओपन इलेक्टिव्ह विषयांमध्ये औद्योगिक क्षेत्रातील अद्ययावत व प्रगत तंत्रज्ञान, आर्थिक नियोजन, ऊर्जा, पर्यावरण व संवर्धन, औद्योगिक सुरक्षा आदी विषयांचा अंतर्भाव आहे.