जगातील ‘टॉप’ हजार विद्यापीठात नागपूर विद्यापीठ नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 11:57 AM2020-03-06T11:57:41+5:302020-03-06T11:58:04+5:30
बुधवारी ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात जगभरातील ‘टॉप’ हजार विद्यापीठांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाकडून जागतिक दर्जाच्या उच्च व तंत्रशिक्षणाबाबत मोठमोठे दावे करण्यात येतात. परंतु प्रत्यक्षात या दाव्यांमधील हवा परत एकदा निघाली आहे. बुधवारी ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात जगभरातील ‘टॉप’ हजार विद्यापीठांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा यात समावेश होऊ शकला नाही.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या ‘एनआयआरएफ’मध्येदेखील (नॅशनल इन्स्टिट्यूशन रॅकिंग फ्रेमवर्क) नागपूर विद्यापीठ पिछाडीवर होते. ‘एनआयआरएफ’प्रमाणेच ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’चे मूल्यांकन संशोधन, वातावरण, जागतिक दर्जाच्या सुविधा यांच्या आधारावर करण्यात आले. नागपूर विद्यापीठाकडून अत्युच्च सुविधा असल्याचे दावे करण्यात येतात. परंतु यातील मापदंड पूर्ण करु शकले नाही. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
गटबाजीचा बसतोय फटका
नागपूर विद्यापीठाची शैक्षणिक पातळीवर पिछेहाट होत आहे. येथील गटबाजीमुळे मोठा फटका बसतो आहे. अभ्यास मंडळांवर शैक्षणिक दर्जा सुधारण्याची मोठी जबाबदारी असते. परंतु अनेक अभ्यास मंडळांवर मर्जीतील लोकांना समाविष्ट करण्यात आले आहे. मागील २० वर्षांपासून अशीच स्थिती असून त्यामुळे विद्यापीठाच्या पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रम तसेच संशोधनाच्या गुणवत्तेत सुधारणा झालेली नाही.