नागपूर विद्यापीठ; आता ‘बी.ई.’ न म्हणता म्हणा, ‘बी.टेक.’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 07:54 PM2022-01-20T19:54:55+5:302022-01-20T19:55:34+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बी.ई.’ऐवजी ‘बी.टेक.’ ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘बी.ई.’ (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग) ही पदवी इतिहासजमा होणार आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बी.ई.’ऐवजी ‘बी.टेक.’ ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘बी.ई.’ (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग) ही पदवी इतिहासजमा होणार आहे. यासंदर्भात नागपूर विद्यापीठाने निर्णय घेतला असून, त्यासंदर्भातील अधिसूचना अखेर जारी करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांप्रमाणेच नागपूर विद्यापीठातील अभियांत्रिकीचे विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘बी.टेक.’ पदवीधर म्हणून ओळखले जातील.
व्हीएनआयटीसह देशातील अनेक अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ‘बी.टेक.’हीच पदवी प्रदान करण्यात येते. ‘एलआयटी’मध्येदेखील (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)‘बी.टेक.’ पदवीचाच अभ्यासक्रम आहे. मात्र नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना ‘बी.ई.’ हीच पदवी देण्यात येत होती. विद्यापीठाने २०२०-२१ या सत्रापासून अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप ‘ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग’ असे केले आहे. त्यामुळे पदवीचे नामांतरण करण्याची मागणीदेखील समोर येत होती. यासंदर्भातील प्रस्ताव २७ ऑगस्ट २०२१ रोजी विद्वत परिषदेसमोर मांडण्यात आला होता. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी विद्वत परिषदेच्या तातडीच्या बैठकीत ‘बी.ई.’चे नामांतरण ‘बी.टेक.’करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. संबंधित प्रस्ताव प्रारूप निदेश समितीकडे सुधारणांसाठी पाठविण्यात आला होता.
समितीने अंतिम प्रारूप तयार करून १७ डिसेंबर २०२१ रोजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याकडे सोपविला होता. त्यानंतर कुलगुरूंनी त्याला मान्यता दिली. त्या अनुषंगाने विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली.
२०२०-२१ पासूनच्या विद्यार्थ्यांना लाभ
२०२०-२१ किंवा त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, संचालित महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालयात ‘बी.ई.’ प्रथम वर्षात प्रवेश घेतला असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ‘बी.टेक.’ पदवी प्रदान करण्यात येईल. यानुसार २०२३-२४ या सत्राच्या अखेरीस अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण करणारा विद्यार्थी ‘बी.टेक.’ पदवीधारक असेल.