नागपूर विद्यापीठ : आता ‘कॉम्रेड’ऐवजी स्वयंसेवकांचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:52 PM2019-07-08T23:52:26+5:302019-07-08T23:53:54+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला स्थान मिळाले आहे. देश उभारणीत संघाचे स्थान यावर विद्यार्थ्यांना ‘बीए’(इतिहास)च्या चौथ्या सत्रात धडे शिकविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीपर्यंत त्या जागेवर ‘कम्युनॅलिझम’चा विकास या मुद्याला स्थान होते. नागपूर संघाचे मुख्यालय असून पहिल्यांदाच अशा प्रकारचा बदल झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला स्थान मिळाले आहे. देश उभारणीत संघाचे स्थान यावर विद्यार्थ्यांना ‘बीए’(इतिहास)च्या चौथ्या सत्रात धडे शिकविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीपर्यंत त्या जागेवर ‘कम्युनॅलिझम’चा विकास या मुद्याला स्थान होते. नागपूर संघाचे मुख्यालय असून पहिल्यांदाच अशा प्रकारचा बदल झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठातील ‘बीए’(इतिहास)च्या अभ्यासक्रमात यावर्षी बदल करण्यात आला आहे. मागील वर्षीपर्यंत द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रात ‘भारताचा इतिहास १८८५-१९४७’ या पेपरमध्ये तिसऱ्या ‘युनिट’मध्ये ‘कम्युनॅलिझम’चा उदय व विकास, क्रिप्स मिशन व कॅबिनेट मिशन प्लॅन या तीन मुद्यांना स्थान होते. मात्र आता बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ‘कम्युनॅलिझम’च्या जागेवर देशाच्या उभारणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थान या मुद्याला स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण पेपरमधून ‘कम्युनॅलिझम’चा इतिहासच हटविण्यात आला आहे. या सत्रापासून विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत हे धडे शिकविण्यात येणार आहेत. विद्यापीठाने संकेतस्थळावरदेखील नवीन अभ्यासक्रम ‘अपडेट’ केला आहे.
यात कुठलेही राजकारण नाही : अधिष्ठाता
यासंदर्भात मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शर्मा यांना विचारणा केली असता यात कुठलेही राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘एमए-इतिहास’च्या अभ्यासक्रमात अगोदरपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत शिकविण्यात येत आहे. ‘एमए’च्या चतुर्थ सत्रात ‘आधुनिक विदर्भाचा इतिहास’ या पेपरला चौथ्या ‘युनिट’मध्ये संघाचा मुद्दा आहे. विदर्भातील सर्वच मोठ्या संघटनांचा अभ्यास यात करण्यात येतो. पदवी पातळीवरदेखील विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी यासाठी ‘बीए’मध्ये बदल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
स्वयंसेवकांकडून स्वागत, ‘कॉम्रेड’ नाराज
अभ्यासक्रमामध्ये संघाला स्थान दिल्याचे संघ स्वयंसेवकांकडून स्वागत करण्यात आले आहे. संघ जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना आहे. देशाच्या विकासात संघ व स्वयंसेवकांचे मौलिक योगदान राहिले आहे. पदवी पातळीवर विद्यार्थ्यांना याची माहिती होते आहे ही चांगली बाब आहे. विद्यार्थ्यांना यामुळे सामाजिक वर्तुळाची माहिती होईल, असे मत एका पदाधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले. तर ‘कम्युनॅलिझम’ला अभ्यासक्रमातच स्थान न दिल्यामुळे डाव्या विचारधारेचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. डाव्या विचारसरणीचे नागपूर व विदर्भातदेखील मोठे कार्य राहिले आहे. संघाचे स्वातंत्र्यलढ्यात काहीच योगदान नव्हते. मात्र अभ्यासक्रमाचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे व संघानेच सर्व काही केले असे विद्यार्थ्यांच्या मनावर ठासविण्याचा हा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अरुण लाटकर यांनी केले.