नागपूर विद्यापीठ : आता फक्त विद्यार्थ्यांनाच देता येणार मॉक टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 09:13 PM2020-09-28T21:13:22+5:302020-09-28T21:14:41+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेसाठी विशेष मोबाईल अॅप तयार केले आहे. परीक्षेचा अंदाज यावा यासाठी अगोदर कुणीही मॉक टेस्ट देऊ शकत होते. मात्र आता केवळ विद्यार्थ्यांनाच ही मॉक टेस्ट देता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेसाठी विशेष मोबाईल अॅप तयार केले आहे. परीक्षेचा अंदाज यावा यासाठी अगोदर कुणीही मॉक टेस्ट देऊ शकत होते. मात्र आता केवळ विद्यार्थ्यांनाच ही मॉक टेस्ट देता येणार आहे. दरम्यान परीक्षेसाठी ऑनलाईन ओळखपत्रांचे वाटप सुरू झाले असून त्यातच युझर आयडी व पासवर्डचा समावेश राहणार आहे.
परीक्षांसाठी मोबाईल अॅप तयार करणारे नागपूर विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले. मात्र मॉक टेस्टवरुन विद्यापीठावर काही लोकांनी टीका करण्यास सुरुवात केली. मात्र ही परीक्षा नेमकी कशी असेल व उत्तरे कशा पद्धतीने द्यावी लागतील याचा अंदाज यावा यासाठीच ही मॉक टेस्ट आहे. वेळेच्या अभावामुळे विषयनिहाय मॉक टेस्ट घेणे शक्य नसल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विद्यापीठातील सुमारे ७० हजार विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. प्रत्यक्षात तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना अॅप डाऊनलोड केले होते. त्यातील अनेकांनी मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यापीठाच्या सर्व्हरवर ताण आला. हीच बाब लक्षात घेत विद्यापीठाने मॉक टेस्ट केवळ विद्यार्थ्यांनाच देता येईल, असे निश्चित केले आहे. विद्यापीठाकडे मोबाईल क्रमांकाची नोंद असलेल्या विद्यार्थ्यांनाच ही सराव परीक्षा देता येणार आहे. सराव परीक्षेच्या पर्यायावर गेल्यास विद्यार्थ्यांच्या नोंदणी क्रमांकावर आधी ‘ओटीपी’ येणार असून त्यानंतरच विद्यार्थी ती परीक्षा देऊ शकणार आहेत.
विद्यार्थ्यांपर्यंत ओळखपत्र महाविद्यालयांनी पोहोचवावी
नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांना १ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यंदा विद्यापीठाने परीक्षेसाठी ऑनलाईन ओळखपत्र पाठविले आहे. हे सर्व ओळखपत्र महाविद्यालयांना पाठविण्यात आले असून तेथून ते विद्यार्थ्यांना जाणार आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत ओळखपत्र ई-मेल, व्हॉट्सअप किंवा प्रत्यक्ष पोहोचविण्याची जबाबादारी महाविद्यालयांची राहणार आहे, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले.