नागपूर विद्यापीठ : परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 12:35 AM2020-07-09T00:35:50+5:302020-07-09T00:37:09+5:30
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करायचे की नाही यासंदर्भात महाराष्ट्रात स्थिती स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात प्रशासनाचे राज्य शासनाकडे लक्ष लागले आहे. जर परीक्षा झालीच तर त्याचे नियोजन कसे करायचे याबाबतदेखील मंथन सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करायचे की नाही यासंदर्भात महाराष्ट्रात स्थिती स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात प्रशासनाचे राज्य शासनाकडे लक्ष लागले आहे. जर परीक्षा झालीच तर त्याचे नियोजन कसे करायचे याबाबतदेखील मंथन सुरू आहे. जर सप्टेंबरमध्ये परीक्षा घ्याव्या लागल्या तर विद्यापीठाला परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी लागेल. अशा स्थितीत महाविद्यालयांना यासाठी मनविणे हे विद्यापीठासमोरील मोठे आव्हान ठरेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दिशानिर्देश जारी केल्यानंतर नागपूर विद्यापीठामध्ये आणखी संभ्रम वाढला आहे. राज्य शासनातर्फे मंगळवारी परीक्षा नकोच, अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांबाबत शासन ठोस कोणता निर्णय घेते यावर विद्यापीठाच्या परीक्षांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
असे असले तरी जर परीक्षा झाली तर काय याबाबत आतापासूनच विचार करावा लागणार आहे. परीक्षांचे पेपर नव्याने ‘सेट’ करणे हे काम लवकर होईल. परंतु आमच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान हे परीक्षा केंद्रांंचे असेल अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. परीक्षा केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे अनिवार्य असेल. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्यादेखील त्या हिशेबाने वाढवावी लागेल. नागपूर विद्यापीठात ५०३ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील २५० हून महाविद्यालये तर ग्रामीण भागात आहेत. सर्वच ठिकाणी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळले तर प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल. अशा स्थितीत नवीन परीक्षा केंद्रांचा शोध प्रशासनाला घ्यावा लागेल. ही तारेवरची कसरत ठरेल. परीक्षा केंद्र निश्चित करताना विद्यार्थ्यांना ते केंद्र येण्याजाण्यासाठी सोयीचे आहे का, तिथे इतर सुविधा आहेत का ही बाबदेखील पाहण्यात येते. त्यामुळे हे सर्व नियोजन करताना प्रशासनाची दमछाक होणार आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
महाविद्यालयांची भूमिकादेखील महत्त्वाची
जर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर महाविद्यालयाची भूमिकादेखील महत्त्वाची ठरेल. परीक्षा केंद्र स्थापन करण्यासाठी महाविद्यालये होकार देतील का हा प्रश्न आहे. शिवाय अनेक महाविद्यालयांत आवश्यक संख्येत प्राध्यापक नाहीत. अशा स्थितीत परीक्षा केंद्रांवरील नियोजन कसे राहील याचादेखील प्रशासनाला विचार करावा लागेल.