नागपूर विद्यापीठ : ऑनलाईन वर्ग सुरू, निकालांची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:11 PM2020-08-18T22:11:48+5:302020-08-18T22:13:00+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून ‘ऑनलाईन’ वर्गांना सुरुवातदेखील झाली आहे. मात्र अद्यापही अगोदरच्या सत्रांचे निकाल जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून ‘ऑनलाईन’ वर्गांना सुरुवातदेखील झाली आहे. मात्र अद्यापही अगोदरच्या सत्रांचे निकाल जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पदव्युत्तर विभागप्रमुख तसेच महाविद्यालयातील प्राचार्यांवर सातत्याने विद्यार्थ्यांकडून प्रश्नांचा भडिमार होत आहे.मात्र निकाल कधी जाहीर होतील याची माहिती त्यांनादेखील नाही.
‘कोरोना’मुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षात बहुतांश अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षाच झाल्या नाहीत. अंतिम वर्ष वगळता इतर सत्रांचे निकाल अगोदरच्या सत्रांच्या कामगिरीवर लावण्याचे राज्य शासनातर्फेनिर्देश देण्यात आले होते. परंतु निकाल लावण्याचे नेमके सूत्र काय असेल याबाबत सुरुवातीला नेमकी निश्चितता नव्हती. शिवाय विद्यापीठांना त्यादृष्टीने प्राधिकरणांची मंजुरी घेऊन नवीन नियमदेखील तयार करणे अनिवार्य होते. विद्यापीठाचे शैक्षणिक सत्रदेखील १४ ते १५ जून ऐवजी १७ ऑगस्ट रोजी सुरू झाले.
आता ‘ऑनलाईन’ वर्ग सुरू झाले असले तरी निकाल जाहीर झालेले नाहीत. अशा स्थितीत नेमके निकाल आता लागणार की आणखी प्रतीक्षा करावी लागणार याबाबत चित्र स्पष्ट नाही. निकालच लागले नाही मग पुढील सत्रांचे वर्ग का घ्यायचे व डोकेदुखी का वाढवून घ्यायची अशी काही महाविद्यालयांची भूमिका आहे. काही ठिकाणी नियमित ‘ऑनलाईन’ वर्ग सुरू झाले आहेत. मात्र निकालांचा संभ्रम कायम असल्याने विद्यार्थीदेखील फारसे उत्साही नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लवकरच दिशानिर्देश जारी करणार
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता लवकरच निकालासंदर्भातील दिशानिर्देश जारी करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाच्या निर्देशानुसारच निकालांचे सूत्र ठरविण्यात आले आहे. याबाबत सर्व महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांना लवकरच कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.