नागपूर विद्यापीठ : ५० टक्के विषय काढा, एटीकेटी मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:08 AM2019-03-27T00:08:36+5:302019-03-27T00:09:41+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नवीन शैक्षणिक वर्षांत त्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी नियमांच्या फेऱ्यात अडकावे लागणार नाही. अनेक वर्षांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने ‘एटीकेटी’च्या नियमांना सुकर केले आहे. यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी कमीत कमी ५० टक्के विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दोन तृतीयांशी विषयांची अट ठेवण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नवीन शैक्षणिक वर्षांत त्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी नियमांच्या फेऱ्यात अडकावे लागणार नाही. अनेक वर्षांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने ‘एटीकेटी’च्या नियमांना सुकर केले आहे. यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी कमीत कमी ५० टक्के विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दोन तृतीयांशी विषयांची अट ठेवण्यात आली आहे.
मंगळवारी विद्यापीठ प्रशासनाने यासंदर्भात नवीन दिशानिर्देश जारी केलेत. यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला ‘एटीकेटी’चा लाभ मिळविण्यासाठी व चौथ्या सत्रात प्रवेश मिळविण्यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र मिळून ५० टक्के विषयांत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सोबतच चौथ्या सत्राचा परीक्षा अर्जदेखील भरणे आवश्यक आहे. तर सहाव्या सत्रात प्रवेशासाठी त्याला पाचव्या सत्रापर्यंतच्या एकूण विषयांपैकी ५० टक्के विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रात प्रवेश घेण्यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय सत्रातील एकूण विषयांपैकी दोन तृतीयांश विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल.
विद्यापीठात ‘एटीकेटी’चा नियम अनेक वर्षांपासून आहे. मात्र नियमांत स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. काही नियमांनुसार तर चौथ्या सत्रात ‘एटीकेटी’चा फायदा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम सत्रात उत्तीर्ण होणे आवश्यक होते. तर काही नियमांनुसार प्रथम व द्वितीय सत्रात उत्तीर्ण झाल्यावरच विद्यार्थ्याला चौथ्या सत्रात प्रवेश मिळत होता. एकसारखे नियम नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासनासमोर संभ्रम निर्माण व्हायचा. आता सर्व नियम स्पष्ट झाल्याने भविष्यात ‘एटीकेटी’संदर्भात कुठलाही संभ्रम राहणार नाही, असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.निरज खटी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता ही समानता आणण्यात आली आहे. याचा त्यांना खूप फायदा होईल. सोबतच कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे म्हणाले.