नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रात्यक्षिक परीक्षा होणार ‘ऑनलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 07:16 PM2022-01-05T19:16:23+5:302022-01-05T19:17:13+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना परत एकदा कोरोनाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. आता प्रात्यक्षिक परीक्षा ‘ऑनलाईन’च होणार आहेत.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना परत एकदा कोरोनाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रमातील तृतीय सत्राच्या लेखी परीक्षा विद्यापीठातर्फे घेण्यात येणार असल्या, तरी प्रात्यक्षिक परीक्षा महाविद्यालयीन पातळीवर आयोजित करायच्या आहेत. विशेष म्हणजे ‘ऑनलाईन’ किंवा ‘ऑफलाईन’ अशा दोन्ही माध्यमांतून परीक्षा घेण्याचे अगोदर जारी केलेले निर्देश विद्यापीठाने बदलले आहेत. आता प्रात्यक्षिक परीक्षा ‘ऑनलाईन’च होणार आहेत.
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी परिपत्रक जारी केले आहे. विद्यापीठाने हिवाळी परीक्षांसंदर्भात २० नोव्हेंबर २०२१ रोजी परिपत्रक जारी केले होते. यात प्रात्यक्षिक परीक्षांसाठी कार्यप्रणाली निर्धारित करण्यात आली होती व त्यानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तृतीय सत्राची प्रात्यक्षिक परीक्षा १० ते १५ जानेवारीदरम्यान ‘ऑनलाईन’ किंवा यापैकी कोणत्याही माध्यमातून आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु आता यात बदल करण्यात आला आहे. आता नियमित, माजी व बहि:शाल विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा केवळ ‘ऑनलाईन’ माध्यमातून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय वेळापत्रकातदेखील बदल करण्यात आला आहे. सर्व प्रात्यक्षिक परीक्षा २५ ते ३० जानेवारी या कालावधीत घ्याव्या लागणार आहेत. विद्यार्थ्यांचे गुणदेखील ‘ऑनलाईन’ माध्यमातूनच विद्यापीठाला पाठवावे, असे महाविद्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत.