नागपूर विद्यापीठ : ३० एप्रिलपर्यंतच्या परीक्षा 'पोस्टपोन' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 12:36 AM2020-04-14T00:36:32+5:302020-04-14T00:37:24+5:30

‘कोरोना’मुळे देशभरात ‘लॉकडाऊन’ घोषित झाला असल्याचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना बसला आहे. राज्यातील स्थिती लक्षात घेता शासनाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाने आता १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीतील परीक्षादेखील ‘पोस्टपोन’ केल्या आहेत.

Nagpur University: Postpone examination till April 30 | नागपूर विद्यापीठ : ३० एप्रिलपर्यंतच्या परीक्षा 'पोस्टपोन' 

नागपूर विद्यापीठ : ३० एप्रिलपर्यंतच्या परीक्षा 'पोस्टपोन' 

Next
ठळक मुद्दे'कोरोना'मुळे आतापर्यंत ८० टक्के परीक्षा पुढे ढकलल्या, लाखो विद्यार्थ्यांचे शासनाकडे लक्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे देशभरात ‘लॉकडाऊन’ घोषित झाला असल्याचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना बसला आहे. राज्यातील स्थिती लक्षात घेता शासनाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाने आता १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीतील परीक्षादेखील ‘पोस्टपोन’ केल्या आहेत. या निर्णयामुळे चौथ्या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्याची ही तिसरी वेळ असून आतापर्यंत विद्यापीठाच्या ८० टक्के परीक्षा ‘पोस्टपोन’ झाल्या आहेत.
‘कोरोना’संदर्भात राज्य शासनाच्या निर्देशांनंतर नागपूर विद्यापीठाने सर्वात प्रथम ३१ मार्चपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे साधारणत: एक लाख विद्यार्थ्यांच्या १८७ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. ३ एप्रिलपासून तर विद्यापीठाचा परीक्षांचा सर्वात मोठा टप्पा सुरू होणार होता. सुमारे २८३ परीक्षांना २ लाख १० हजार विद्यार्थी बसणार होते. त्यानंतर २८ मार्च रोजी विद्यापीठाने त्या परीक्षादेखील पुढे ढकलण्याचे निर्देश जारी केले. ‘लॉकडाऊन’ १४ एप्रिलपर्यंत राहील व त्यानंतर स्थिती सामान्य होईल असा अंदाज होता. परंतु तसे होऊ शकले नाही.
महाराष्ट्र शासनाच्या १३ एप्रिल रोजीच्या पत्रानुसार विद्यापीठाने १५ एप्रिलपर्यंतच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने आतापर्यंत साधारणत: साडेसहाशेहून अधिक परीक्षा पुढे ढकलल्या असून यात पावणेचार लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार होते.

शासन निर्देशांनंतर पुढील पाऊल
परीक्षा पुढे ढकलण्याचे परिपत्रक जारी केले आहे. राज्य शासनाच्या निर्देशांनंतर परीक्षांच्या पुढील वेळापत्रकाबाबत निर्णय होईल असे, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले.

परीक्षा विभागाची कसरतच
आता पुढील परीक्षांचे नियोजन करण्यासंदर्भात परीक्षा विभागाची कसरतच होणार आहे. पुरवणी परीक्षा, नियमित परीक्षा यांच्यासह ‘पोस्टपोन’ केलेल्या परीक्षांचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर निश्चितच राहणार आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्येदेखील चलबिचल वाढली आहे. विशेषत: अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे काय होणार, हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांचे लक्ष शासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.

या आहेत प्रमुख परीक्षा

  •  फार्मसी, गृहविज्ञान, बीकॉम दुसरे व चौथे सत्र
  •  अप्लाईड गृहविज्ञान, इंटेरिअर डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेन्ट
  •  एम.ए., एमएस्सी, एमएसडब्ल्यू
  •  बीए-एलएलबी चौथे व दहावे सत्र
  •  पदव्युत्तर गृहविज्ञान पहिले व तिसरे सत्र
  •  आर्किटेक्चर दहावे सत्र
  •  बी.ई. दुसरे, चौथे, सहावे व आठवे सत्र

Web Title: Nagpur University: Postpone examination till April 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.