विद्यापीठातील प्रकरण गंभीर, सखोल चौकशी व्हावी; दोषींवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 12:40 PM2022-11-14T12:40:19+5:302022-11-14T13:00:41+5:30
लैंगिक छळाच्या बनावट तक्रारींची भीती दाखवून लाखोंची खंडणी वसुली; विद्यापीठ वर्तुळात खळबळ
नागपूर : स्थापनेची शताब्दी साजरी करणाऱ्या नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांकडून लैंगिक छळाच्या बनावट तक्रारींची भीती दाखवून विद्यापीठातीलच एका सहयोगी प्राध्यापकाने लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याचा सनसनाटी प्रकार उजेडात आला आहे.
या संदर्भातील वृत्त रविवारी प्रकाशित होताच विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली. अनेकांचे फोन खणाणू लागले. विद्यापीठाशी संबंधित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या एकूणच प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला असून, हे प्रकरण विद्यापीठासाठी अतिशय गंभीर असून याची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीच्या नावे विद्यापीठात लाखोंची खंडणी वसुली
तातडीने चौकशी होऊन, दोषीवर कारवाई व्हावी
विद्यापीठाला १०० वर्षे पूर्ण होत आहे. त्याच्या सेलेब्रेशनची तयारी सुरू आहे. यातच असा प्रकार उघडकीस येणे ही गंभीर बाब आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या घटना घडत असतात; परंतु या प्रकारची घटना प्रशासनाचा धाक राहिला नाही, हे स्पष्ट करते. या घटनेची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई नव्हे तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
- आ. अभिजित वंजारी
प्रशासनाने काय कारवाई केली याचा खुलासा आधी व्हावा. आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढत असतोच; परंतु प्राध्यापकाने प्राध्यापकांची फसवणूक करावी, हे धक्कादायक व निराशाजनक आहे. विद्यापीठ परिसराकडे पाहूनच इतर संस्था, महाविद्यालये आदर्श घेत असतात. त्यात अशी घटना घडणे खरेच धक्कादायक आहे. याची सखोल चौकशी होऊन दोषींवर तातडीने कारवाई व्हावी; परंतु या संदर्भात काय कारवाई केली. चौकशी समिती नेमली की नाही, याचा खुलासा प्रशासनाने आधी करावा.
- विष्णू चांगदे, माजी सिनेट व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य
विद्यापीठाला १०० वर्षे होत आहे. अशा परिस्थितीत या प्रकारची घटना धक्कादायक आहे. जनसंवाद विभागातील सहायक प्राध्यापक व जनसंपर्क अधिकारी धर्मेश धवनकर यांचा पूर्वेतिहास काही चांगला नाही. त्यामुळे या प्रकरणाची नि:पक्षपणे चौकशी व्हावी आणि दोष सिद्ध झाला तर आरोपीला तातडीने सस्पेंड करण्यात यावे.
प्रा. प्रशांत डेकाटे, माजी सिनेट सदस्य
- प्राध्यापकांचीच फसवणूक होत असेल तर विद्यार्थ्यांचे काय?
विद्यापीठासारख्या संवेदनशील परिसरात अशा प्रकारच्या घटना घडणे हा प्रकारच लज्जास्पद आहे. विद्यापीठ प्रशासनाचा कुठलाही धाक नाही, हे यातून दिसून येते. विद्यापीठात प्राध्यापकांद्वारे प्राध्यापकांचीच फसवणूक होत असेल तर विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न यातून निर्माण होतो. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
- अतुल खोब्रागडे, युवा ग्रॅज्युएट फोरम, संयोजक