नागपूर विद्यापीठाची ‘निकाल एक्स्प्रेस’ यंदाही जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 11:23 AM2020-02-20T11:23:48+5:302020-02-20T11:24:07+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लेटलतिफ निकालांसाठी प्रसिद्ध होते. मात्र विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केल्यानंतर मागील काही वर्षांत नागपूर विद्यापीठाच्या ‘निकाल एक्स्प्रेस’ने चांगलाच वेग घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही वर्षांअगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लेटलतिफ निकालांसाठी प्रसिद्ध होते. मात्र विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केल्यानंतर मागील काही वर्षांत नागपूर विद्यापीठाच्या ‘निकाल एक्स्प्रेस’ने चांगलाच वेग घेतला आहे. हिवाळी परीक्षेतील ९८ टक्के निकाल हे तीन दिवसाच्या आत जाहीर झाले असून आता केवळ ९ निकाल लागणे प्रलंबित आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर विद्यापीठात हिवाळी सत्रात ९३५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात ४०२, दुसऱ्या टप्प्यात १५९ तर तिसºया टप्प्यात ३७४ परीक्षा होत्या. यापैकी पहिल्या टप्प्यातील ४०१, दुसºया टप्प्यातील १४९ तर तिसºया टप्प्यातील ३६८ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. एकूण आकडेवारी पाहिली तर आतापर्यंत ९२५ (९८.९३ टक्के) निकाल जाहीर झाले आहेत. यातील ९१८ निकाल हे परीक्षा झाल्यानंतर ३० दिवसांच्या आतच जाहीर झालेत.
आॅनस्क्रीन मूल्यांकनामुळे वाढला वेग
एकेकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संथ निकालांमुळे विद्यार्थ्यांचे मोर्चांवर मोर्चे यायचे. नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल साधारणत: आॅगस्ट, सप्टेंबरपर्यंत लागायचे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागायचा. २०१४ मध्ये अवघ्या २६ टक्के परीक्षांचे निकाल ३० दिवसाच्या आत जाहीर झाले होते. २०१५ मध्ये हाच आकडा ३४.५३ टक्के इतका होता. त्यानंतर ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाला सुरुवात झाली. त्यानंतर सातत्याने प्रत्येक वर्षी निकालांचा वेग वाढत गेला.२०१६ मध्ये ५०.८३ टक्के परीक्षांचे निकाल ३० दिवसाच्या आत जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले. २०१७ मध्ये ७०.३२ टक्के निकाल ३० दिवसाच्या आत जाहीर झाले. २०१८ च्या उन्हाळी परीक्षात तर गैरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल सरासरी ३१.४३ दिवस तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल सरासरी ३१.२२ दिवसात जाहीर झाले.