नागपूर विद्यापीठ : कुलगुरूंविरोधात सदस्य होणार आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:36 AM2019-03-13T00:36:29+5:302019-03-13T00:37:34+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेची बैठक बुधवारी होणार आहे. कुलगुरूंच्या भूमिकेवरून विद्यापीठ वर्तुळात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे सदस्य त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची चिन्हे आहेत. विधिसभेच्या बैठकीत प्रसारमाध्यमांना येण्यास केलेली बंदी, प्रश्न विचारण्यासाठी अटींवर अटी आणि विद्यापीठात शैक्षणिक दहशतवाद सुरू आहे, हे कुलगुरूंचे वक्तव्य यावरून वातावरण तापणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेची बैठक बुधवारी होणार आहे. कुलगुरूंच्या भूमिकेवरून विद्यापीठ वर्तुळात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे सदस्य त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची चिन्हे आहेत. विधिसभेच्या बैठकीत प्रसारमाध्यमांना येण्यास केलेली बंदी, प्रश्न विचारण्यासाठी अटींवर अटी आणि विद्यापीठात शैक्षणिक दहशतवाद सुरू आहे, हे कुलगुरूंचे वक्तव्य यावरून वातावरण तापणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठात शैक्षणिक दहशतवाद असल्याचे कुलगुरू डॉ. काणे यांनी मागील आठवड्यात केले होते. त्यावरून शिक्षणक्षेत्रातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे विधिसभेच्या अनेक सदस्यांनी दिलेले प्रश्न प्रशासनाने रद्द केले आहेत. त्यामुळे सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सोबतच बैठकीदरम्यान प्रश्न विचारण्याचा वेळदेखील निर्धारित केला आहे, तर सदस्यांनी प्रस्ताव मांडण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व मुद्यांवरून सदस्य प्रशासनाला घेरण्याच्या तयारीत आहे. शुक्रवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत केवळ १९ सदस्यांना प्रश्न मांडण्याची परवानगी देण्यात आली आहे, शिवाय प्रश्न विचारण्यासाठी केवळ एक तासाचा वेळ देण्यात आला आहे. इतक्या कमी वेळात प्रश्न व त्याचे उत्तर पूर्ण होणे शक्य नाही. सदस्यांना मनमोकळेपणाने प्रश्न विचारणे व प्रस्ताव मांडू देण्याची विद्यापीठाची परंपरा राहिली आहे. मात्र त्यावर अंकुश आणण्यात येत आहे. विद्यापीठातील घोटाळे समोर येऊ नये या भीतीपोटी विद्यापीठाने हे पाऊल उचलल्याचा आरोप काही सदस्यांनी केला आहे. व्यवस्थापन परिषदेत प्रशासनाच्या या भूमिकेचा सदस्यांनी विरोध केला. मात्र त्यांना परिनियमाचा हवाला देत गप्प बसविण्यात आले होते.
प्रसारमाध्यमांना ‘नो एन्ट्री’
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कुलगुरू तसेच प्रशासनाविरोधात प्रसारमाध्यमांतून टीका होत आहे. त्यातच विधिसभेच्या बैठकीत प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीत सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा हवाला देत कुलगुरूंनी हा निर्णय घेतला. याला काही सदस्यांनी विरोधदेखील केला होता. मात्र त्याला कुलगुरूंनी जुमानले नाही. यामागे कारण काय, अशी विचारणादेखील करण्यात आली. कुलगुरूंनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा-२०१६ चा हवाला दिला. परंतु जर प्रवेश देऊ नये असे कुठेही नमूद नाही, मग प्रसारमाध्यमांवर कुठल्या अधिकारात बंदी घातली असे विचारण्यात आले असता, कुलगुरू व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मौन धारण केले होते.
कुलगुरू लोकशाहीला मानतात का?
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलगुरूंवर जोरदार प्रहार केला आहे. कुलगुरू हे मागील काही दिवसांपासून एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे वागत आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाली आहे. कुलगुरूंनी अनेकदा स्वत:चे अपयश लपविण्यासाठी मनमानी केली आहे. कुलगुरूंनी आपल्या वक्तव्यासाठी माफी मागावी किंवा राजीनामा द्यावा, अशी मागणी अभाविपने केली आहे. प्रसारमाध्यमांना विधिसभेत बंदी घालणे म्हणजे लोकशाहीच्या मूळ तत्त्वावर आघात घातल्यासारखे आहे. ते लोकशाहीला मानतात का, असे वाटायला लागले आहे. परीक्षा विभागातील हिशेबातील गडबडीबाबत ते मौन बाळगून आहेत. शिवाय विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नांना विधिसभेतून बगल देण्यात आली आहे. जर कुलगुरूंनी मागण्या मान्य केल्या नाही तर जोरदार आंदोलनाचा इशारा अभाविपचे शहर महामंत्री वैभव बावनकर यांनी दिला आहे. ‘अभाविप’च्या पत्रपरिषदेला महानगर सहमंत्री अमित पटले, शिवेश हरगुडे, करण खंडले, समर्थ रागीट, विधिसभा सदस्य टारझन गायकवाड, वसंत चुटे, वामन तुर्के, समय बनसोड, विजय मुनीश्वर, सुनील खंडारे, समीर परते, प्रवीण रणदिवे, प्रवीण उदापुरे, जगदीश जोशी हे उपस्थित होते.
कुलगुरूंनी राजीनामा द्यावा
दुसरीकडे ‘एनएसयूआय’तर्फे कुलगुरूंच्या विरोधात हस्ताक्षर अभियान चालविण्यात आले. परीक्षा विभागातील लाखोंची रक्कम गायब झाल्यावरदेखील कुलगुरूंनी कारवाई केली नाही. कुलगुरूंनी या प्रकरणात त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी ‘एनएसयूआय’तर्फे करण्यात आली. जिल्हाध्यक्ष आशिष मंडपे, महासचिव प्रतीक कोल्हे यांच्या नेतृत्वात हस्ताक्षर अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रदेश महासचिव अजित सिंह, जिल्हा महासचिव प्रणव सिंह ठाकूर, ऋषी भोयर, आशिष राऊत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
कुलगुरूच दहशतवाद पसरवीत आहेत
‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन’चे संचालक सुनील मिश्रा यांनी कुलगुरूंवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारून कुलगुरूंनी लोकशाहीवरच आघात करण्याचे काम केले आहे. कुलगुरू म्हणतात की, विद्यापीठात शैक्षणिक दहशतवाद आहे. मात्र प्रत्यक्षात डॉ. काणे हे स्वत:च लोकशाहीविरोधातील वातावरण पसरवीत असून विद्यापीठात भीती निर्माण करीत आहेत, असा आरोप मिश्रा यांनी केला आहे.