नागपूर विद्यापीठ :१०० हून अधिक प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 10:30 PM2020-01-03T22:30:52+5:302020-01-03T22:36:59+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून मूल्यांकनात वेळकाढूपणा करणाऱ्या सुमारे १०० हून अधिक प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निकालांची गती यंदादेखील कायम असली तरी वाणिज्य शाखेच्या निकालांना काहिसा उशीर झाला आहे. परीक्षा विभागाने ही बाब गंभीरतेने घेतली असून मूल्यांकनात वेळकाढूपणा करणाऱ्या सुमारे १०० हून अधिक प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या ९३५ पैकी जवळपास ६२७ निकाल जाहीर झाले आहेत. हे निकाल ३० दिवसाच्या आत जाहीर झाले आहेत. मागील सत्रांप्रमाणे यंदादेखील मूल्यांकनाचा वेग कायम आहे. परंतु वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत येणाऱ्या ‘बीकॉम’च्या निकालांना काहिसा उशीर झाला आहे. ‘बीकॉम’चे एक, तीन व पाच या सत्रांचे निकाल लांबले आहेत. इंग्रजी व वाणिज्य विषयाचे काही प्राध्यापक मूल्यांकनाला नियमित येतच नव्हते अशी बाब परीक्षा विभागाला आढळून आली. या सर्वांना प्रक्रियेप्रमाणे मूल्यांकनाचे पत्र गेले होते. परंतु तरीदेखील मूल्यांकनात त्यांनी हलगर्जीपणा दाखविला आहे. परीक्षेच्या कामाला गंभीरतेने न घेणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश २०१८ सालच्या ‘जेबीव्हीसी’ तसेच पुणे येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आले होते. यानुसार ही कारवाई झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात माध्यम समन्वयक डॉ.श्याम धोंड यांना संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
मूल्यांकनाला न येणे ही गंभीर बाब : प्रफुल्ल साबळे
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता इंग्रजी विषयाच्या ८८ व वाणिज्यच्या ३० प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित नोटीस ही नवीन विद्यापीठ कायद्यानुसार देण्यात आली आहे. त्यांना यासंबंधातील पत्र लवकरच मिळतील, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या मूल्यांकनाचा वेग चांगला आहे. परंतु काही प्राध्यापकांमुळे जर त्यात खीळ बसत असेल तर ती गंभीर बाब आहे व म्हणूनच कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.