नागपूर विद्यापीठ; आवाज केला ‘म्यूट’; ‘सिनेट’ सदस्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:19 AM2020-11-19T11:19:45+5:302020-11-19T11:20:37+5:30

Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘सिनेट’ची ‘ऑनलाईन’ बैठक वादग्रस्तच ठरली. बैठकीत काही सदस्यांनी आवाज ‘म्यूट’ करण्यात आला असल्याचा आरोप केला.

Nagpur University; Sound muted; Allegations by members of the Senate | नागपूर विद्यापीठ; आवाज केला ‘म्यूट’; ‘सिनेट’ सदस्यांचा आरोप

नागपूर विद्यापीठ; आवाज केला ‘म्यूट’; ‘सिनेट’ सदस्यांचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देसंतप्त सदस्यांकडून बहिष्कारास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘सिनेट’ची ‘ऑनलाईन’ बैठक वादग्रस्तच ठरली. अगोदरपासूनच ‘ऑफलाईन’ बैठक घेण्याचा सदस्यांचा आग्रह होता. त्यातच बैठकीत काही सदस्यांनी आवाज ‘म्यूट’ करण्यात आला असल्याचा आरोप केला. हाती मुद्दे असूनदेखील प्रशासनाला धारेवर धरणारे प्रश्न सदस्यांना विचारता आले नाहीत, असे कारण देत काही संतप्त सदस्यांनी बैठकीवरच बहिष्कार टाकला.

३ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या ‘सिनेट’ची ‘ऑनलाईन’ बैठक झाली होती. त्या बैठकीला सदस्यांच्या विरोधानंतर स्थगित करण्यात आले होते. स्थगित बैठक ‘ऑफलाईन’ माध्यमातूनच व्हावी अशी भूमिका सदस्यांनी मांडली होती. ‘ऑनलाईन’ माध्यमातून प्रशासनाला प्रश्न विचारताना अडथळे येतात असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे १८ नोव्हेंबरची बैठक ‘ऑफलाईन’ व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात १७ नोव्हेंबर रोजी सदस्यांना ‘ऑनलाईन’ बैठकीचे ‘ई-मेल’ गेले.

बुधवारी सकाळी बैठकीला सुरुवात झाली. सुरुवातीलाच सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली व विद्यापीठाच्या विविध धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. मात्र अनेकांनी त्यांचे आवाजच ‘म्यूट’ करून ठेवल्याचा आरोप केला. काही विशिष्ट सदस्य प्रशासनाला कोंडीत पकडतात. त्यांची माहिती प्रशासनाला होती. त्यांचाच आवाज ‘म्यूट’ करण्यात आला. त्यामुळे आम्ही निषेध म्हणून बहिष्कार टाकला, असे सदस्य अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी यांनी सांगितले.

यासदंर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क झाला नाही. मात्र असा कुठलाही प्रकार प्रशासनाकडून झाला नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. बैठकीत ३३ सदस्य बोलले व काहींनी प्रशासनाला प्रश्नदेखील विचारले. तांत्रिक अडथळ्यांमुळे काही जणांना आवाज गेला नसेल. मात्र याचा अर्थ प्रशासनाने ‘म्यूट’ केले असा होत नसल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

‘लॉगिन’मध्ये अडचण

काही सदस्यांना ‘ऑनलाईन’ माध्यमातून ‘लॉगिन’ करण्यात अडचण आली. याबाबत उपस्थित सदस्यांनी प्रशासनाला अवगत केले व बैठक स्थगित करण्याची मागणी केली. मात्र बैठक कार्यक्रम पत्रिकेनुसार घेण्यात आली.

Web Title: Nagpur University; Sound muted; Allegations by members of the Senate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.