नागपूर विद्यापीठ ; माजी सरन्यायाधीशांशिवाय झाला विशेष दीक्षांत समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 10:54 AM2021-07-10T10:54:02+5:302021-07-10T10:55:37+5:30
Nagpur News सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद एलएलडी ही पदवी प्रदान करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे शुक्रवारी विशेष दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद एलएलडी ही पदवी प्रदान करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे शुक्रवारी विशेष दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत . त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र श्रीनिवास बोबडे यांनी मानद पदवी व सन्मानचिन्हाचा स्वीकार केला.
नागपूर विद्यापीठातर्फे सुमारे सात दशकांनंतर दीक्षांत सभागृहात विशेष व १०८ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यांदाच विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय ऑनलाईन समारंभ आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ऑनलाईन माध्यमातून अध्यक्षस्थान भूषविले तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे, कुलसचिव डॉ.राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांच्याशिवाय व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिष्ठाता मंचावर उपस्थित होते. सर्व पदवीधरांनी आयुष्यात प्रामाणिकपणाची कास धरावी. तसेच पालक, गुरु व देशाबाबत श्रद्धा बाळगावी, असे आवाहन राज्यपालांनी केले. विद्यार्थ्यांच्या जीवनातील खरा संघर्ष पदवीनंतर सुरू होत असतो. आयुष्याच्या कुरुक्षेत्रातील खरा शत्रू ओळखून व स्वत:चे दुर्गुण बाजूला सारत संघर्ष केला पाहिजे. संशोधनाचा फायदा देश व समाजाच्या प्रगतीला होतो. त्यामुळे विद्यापीठाने संशोधनावर जास्तीत जास्त भर द्यावा, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले.
१,२५६ विद्यार्थ्यांनी पाहिला ऑनलाईन समारंभ
नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांशिवाय दीक्षांत समारंभ पार पडला. इंटरनेटवरील विविध माध्यमांवर दीक्षांत समारंभाचे लाईव्ह प्रसारण झाले. ७७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त झाली. त्यातील १ हजार २५६ विद्यार्थ्यांनी यू-ट्यूबवरील विद्यापीठाच्या चॅनलवर समारंभ पाहिला. तर वेबेक्सवर मोजके विद्यार्थी व पीएचडी उमेदवार सहभागी झाले होते. फेसबुकवर शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.