नागपूर विद्यापीठ : ऑगस्टमध्ये होणार विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 11:33 PM2019-07-02T23:33:52+5:302019-07-02T23:35:08+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २५ वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या खुल्या निवडणुका होणार आहेत. विद्यापीठाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वात अगोदर महाविद्यालय व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होतील. त्यानंतर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पार पडतील. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळेच विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका ऑगस्ट महिन्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची अधिसूचना १२ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे व ऑगस्ट अखेरपर्यत निवडणुका होतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २५ वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या खुल्या निवडणुका होणार आहेत. विद्यापीठाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वात अगोदर महाविद्यालय व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होतील. त्यानंतर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पार पडतील.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळेच विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका ऑगस्ट महिन्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची अधिसूचना १२ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे व ऑगस्ट अखेरपर्यत निवडणुका होतील. यासंबंधात विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांची काही दिवसांअगोदर बैठक झाली होती.
निवडणुकीच्या तयारीसाठी प्रभारी कुलसचिव डॉ.विनायक देशपांडे यांनी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची ६ जुलै रोजी बैठक बोलविली आहे. दीक्षांत सभागृहात ही बैठक होईल. प्रत्येक संघटनेच्या चार ते पाच प्रतिनिधींना ४ जुलैपर्यंत नावनोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेची सखोल माहिती देण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
१९९४ पासून बंद होत्या खुल्या निवडणुका
राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये १९९४ मध्ये नवीन विद्यापीठ कायदा लागू झाला होता. तोपर्यंत सर्वसाधारण निवडणुकांप्रमाणेच विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका व्हायच्या. मात्र निवडणुकांतील हिंसा लक्षात घेता गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थी परिषद गठित करण्याची प्रणाली सुरु करण्यात आली. १९९६ साली यानुसार सर्वप्रथम निवडणुका झाल्या होत्या. विद्यापीठाशी जुळलेल्या विद्यार्थी संघटनांनी याचा जोरदार विरोध केला होता. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार आता परत खुल्या निवडणुका होणार आहेत.