नागपूर विद्यापीठ :‘सोशल मीडिया’वरील यादीमुळे विद्यार्थी संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 11:42 PM2020-10-27T23:42:27+5:302020-10-27T23:44:09+5:30
Nagpur University Students confused राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू असताना विद्यार्थी एका वेगळ्याच संभ्रमात पडले आहेत. परीक्षा देऊनही हजारो विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविले असून सर्वच विद्यार्थ्यांना परत परीक्षा द्यावी लागणार असल्याचा दावा त्यात करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू असताना विद्यार्थी एका वेगळ्याच संभ्रमात पडले आहेत. परीक्षा देऊनही हजारो विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविले असून सर्वच विद्यार्थ्यांना परत परीक्षा द्यावी लागणार असल्याचा दावा त्यात करण्यात येत आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. मात्र सुमारे तीन हजार विद्यार्थीच आतापर्यंत परीक्षा देऊ शकले नसून त्यांचीच परीक्षा होणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
मंगळवारी परीक्षार्थींचे नाव असलेल्या काही याद्या ‘सोशल मीडिया’वर प्रसारित झाल्या. ज्यामध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याचे नाव, विषय, बैठक क्रमांक लिहिले असून त्यासमोर अनुपस्थित असे लिहून आहे. यामुळे परीक्षा देऊनही यादीत गैरहजर दाखवल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या यादीतील विद्याार्थी हे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे आहेत. ही यादी समाजमाध्यमावर प्रसारित झाल्याने विद्याार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी नियमित दिवसाला व वेळेत परीक्षा दिली होती. तरीही यादीमध्ये त्यांच्या नावासमोर अनुपस्थित लिहिल्याने अनेक विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार का? असा संभ्रम निर्माण झाला आहे.
यासंदर्भात परीक्षा विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. संबंधित यादी ही परीक्षा विभागानेच महाविद्यालयांना पाठविली होती. त्यातील कुठले विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले याची तपासणी करण्याची सूचना होती. मात्र हे सगळेच विद्यार्थी अनुपस्थित असल्याचा अपप्रचार काही लोकांनी केला आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत ५४ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. परंतु यापैकी फक्त २ हजार ९२५ विद्यार्थी परीक्षेत गैरहजर राहिले. विद्यापीठाकडे प्रत्येक विद्यार्थ्याचा ‘डाटा’ सुरक्षित आहे. त्यामुळे कुठल्याही अफवेला बळी न पडता विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याकडून करण्यात आले आहे.