नागपूर विद्यापीठ : विद्यार्थ्यांना परीक्षा वेळापत्रकाची 'एसएमएस'द्वारे मिळणार माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 08:50 PM2020-03-11T20:50:55+5:302020-03-11T20:51:46+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देणारा प्रस्ताव विधीसभेने संमत केला आहे. विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेचे वेळापत्रक व निकालांची सूचना थेट मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’च्या माध्यमातून मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देणारा प्रस्ताव विधीसभेने संमत केला आहे. विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेचे वेळापत्रक व निकालांची सूचना थेट मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’च्या माध्यमातून मिळणार आहे. विधीसभेत यासंदर्भात प्रवीण उदापुरे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. यामुळे नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा मिळणार आहे.
नागपूर विद्यापीठातर्फे परीक्षेचे वेळापत्रक तसेच निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतात. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी नियमितपणे संकेतस्थळ पाहू शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा त्यांना उशिरा माहिती मिळते. शिवाय निकाल आल्यानंतर फेरमूल्यांकनाच्या अर्जासाठी फारच कमी दिवसांचीच मुदत असते. निकालाची माहितीच उशिरा मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना वेळेत फेरमूल्यांकनासाठी अर्ज करता येत नाही. महाविद्यालयांकडूनदेखील त्यांना मुदतीत माहिती दिली जात नाही. दुसरीकडे निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील परीक्षेचा अर्ज भरावा लागतो. तो अर्ज भरायला उशीर झाला तर विलंब शुल्क द्यावे लागते व त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसतो.
हीच बाब लक्षात घेऊन प्रवीण उदापुरे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षांचे वेळापत्रक व निकाल यांची सूचना ‘एसएमएस’द्वारे देण्यासंदर्भातील प्रस्ताव विधीसभेच्या बैठकीत मांडला. विधीसभेने या प्रस्तावाला मंजुरी दिली.