स्वदेशी साहित्यातून तयार करा एलईडी लाइट्स!
By जितेंद्र ढवळे | Published: April 25, 2024 04:32 PM2024-04-25T16:32:38+5:302024-04-25T16:36:13+5:30
Nagpur : विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
नागपूर : स्वदेशी साहित्यातून एलईडी लाईट्सची निर्मिती करणे शक्य आहे. याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात कार्यशाळा पार पडली. घरगुती वापराचे एलईडी लाइट्स तसेच एलईडी पथदिवे तयार करणारे साहित्याची निर्मिती कशाप्रकारे करावी याबाबत विद्यार्थ्यांना कार्यशाळेतून प्रशिक्षण देण्यात आले.
भौतिकशास्त्र विभागात आयोजित कार्यशाळेला वाठोडकर उद्योगाचे उपेंद्र वाठोडकर, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओम प्रकाश चिमणकर, ल्युमिनन्स प्रयोगशाळेचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे यांची कार्यशाळेत उपस्थिती होती.
भौतिकशास्त्र विभागातील एमएससी व संशोधक विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना उपेंद्र वाठोडकर यांनी घरगुती एलईडी तसेच एलईडी पथदिवे कसे काम करतात, याची माहिती देत एलईडी लाईटच्या उत्पादनाचे महत्त्व समजावून सांगितले.
काय आहेत फायदे?
१) घरगुती एलईडी व एलईडी पथदिव्यांच्या वापरामुळे ९० टक्के विजेची बचत होते असे उपेंद्र वाठोडकर यांनी सांगितले.
२) विद्यार्थ्यांना स्वतःच्या बळावर एलईडी लाइट्स निर्मितीचा उद्योग सुरू करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले.
कुठे मिळते साहित्य
एलईडी लाइट्स निर्मितीसाठी लागणाऱ्या मटेरिअल्स निर्मिती भारतात होत नाही. चीन, तायवान आदी देशातून एलईडी लाइट्स निर्मितीचे मटेरिअल्स विकत घेतले जाते. त्यानंतर आपल्याकडे एलईडी लाइट्सचे उत्पादन केल्या जाते. एलईडी लाइट्स बनविण्याचे साहित्याची निर्मिती देखील आपल्या देशात व्हावी या दृष्टीने वाठोडकर यांनी मार्गदर्शन केले. वाठोडकर यांनी स्वतः बनविलेले साहित्य व त्यापासून एलईडी लाईट्सची निर्मिती कशाप्रकारे करता येईल, याची माहिती दिली.
विद्यार्थ्यांकडून लाल, निळा, हिरवा रंग उत्सर्जित करणारे मटेरियल बनवून घेतले. एलईडी लाइट्स उत्पादनात हे मटेरियल महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे विद्यार्थी स्वतः एलईडी लाइट्स निर्मितीत लागणारे मटेरियल बनविण्याचा प्रयत्न करू शकतात. यामुळे पैशाची बचत होणार असून विद्यार्थ्यांना स्वबळावर उभे राहता येईल.
- प्रा. डॉ. संजय ढोबळे, भौतिकशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ