नागपूर विद्यापीठ ; ‘कॅम्पस’मध्ये ‘ग्रीन एनर्जी’ येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 10:26 AM2020-11-09T10:26:50+5:302020-11-09T10:27:15+5:30
Nagpur News Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘कॅम्पस’ तसेच प्रशासकीय परिसर आता ‘ग्रीन एनर्जी’वर चालण्याची शक्यता आहे.
आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘कॅम्पस’ तसेच प्रशासकीय परिसर आता ‘ग्रीन एनर्जी’वर चालण्याची शक्यता आहे. विद्यापीठाने सौरऊर्जा प्रकल्प लावण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम करण्यासाठी पुण्यातील एका एजन्सीला नियुक्त करण्याचा मानसदेखील बनविला आहे. सोमवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडण्यात येईल.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार वीज देयकावर होणारा खर्च लक्षात घेता विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. ‘कोरोना’ कारणांमुळे व्यवस्थापन परिषदेची बैठक न झाल्याने कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी त्यांच्या विशेषाधिकारात यासंदर्भातील प्रस्तावाला ३ ऑक्टोबर रोजी मान्यता दिली होती. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मांडला जाण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प लावण्यासाठी विद्यापीठाने पुण्यातील ‘मेडा’ची (महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी) निवड केली आहे. प्रकल्प लावण्याची प्रक्रिया २०१९ पासून सुरू झाली होती. मात्र प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती. समितीने या दिशेने ठोस पावले उचलण्यासंदर्भात शिफारस केली होती. यानंतर विद्यापीठाने ‘मेडा’शी संपर्क केला होता, सोबतच नागपूर विभागासाठी मंजूर करण्यात आलेल्या एजन्सीचे नाव सुचविण्यासदेखील सांगितले होते. याअंतर्गत ‘मेडा’ने दोन एजन्सीचे नाव सुचविले आहे. व्यवस्थापन परिषदेच्या मंजुरीनंतरच एजन्सीला काम देण्यात येईल.