कुलगुरूंच्या वाढणार अडचणी; एमकेसीएलप्रकरणी उपसचिवांचा चौकशी अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 02:22 PM2023-03-11T14:22:14+5:302023-03-11T14:37:48+5:30
टेंडरमधील गडबडीच्या तक्रारीनंतर नेमली होती समिती
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परीक्षा, एमकेसीएल विविध कामांसाठी काढलेल्या टेंडरमधील गडबडीच्या तक्रारीनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अजित बावस्कर यांच्या नेतृत्वात गठित चौकशी समितीने आपल्या अहवालात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तसेच या पूर्ण प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याची शिफारस केली आहे. यासोबतच प्रथम वर्षाच्या निकालाबाबत खरी परिस्थिती लपविल्याबाबत विद्यापीठ परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे निदेशक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. समितीने आपल्या अहवालात काय कारवाई करावी, याबाबत कुठलीही शिफारस मात्र केलेली नाही.
कुलगुरू डॉ. चौधरी यांनी अचानक विद्यापीठाच्या परीक्षेची जबाबदारी एमकेसीएलकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. विद्यापीठाने यापूर्वी एमकेसीएलसोबतचा करार रद्द करीत त्यांच्याकडून परीक्षेचे कार्य काढून घेतल्याची माहिती असूनही त्यांनी हा निर्णय घेतला होता. ही बाब सर्वप्रथम लोकमतनेच उघडकीस आणली होती. यासंदर्भात ३ जानेवारी २०२२ रोजीच्या अंकात वृत्तही प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच सिनेट सदस्यांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते; परंतु डॉ. चौधरी यांनी स्पष्ट उत्तर दिले नव्हते.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांनी बोलावली होती बैठक
एमकेसीएलवर डॉ. चौधरी यांची मेहरबानी आणि पहिल्या वर्षाच्या परीक्षेतील निकालात होत असलेल्या उशिराचा मुद्दा त्यावेळी विधान परिषदेतही गाजला होता. सभागृहात आश्वासन दिल्यानंतर तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागपुरात येऊन विद्यापीठात एक उच्चस्तरीय बैठकसुद्धा घेतली होती. या बैठकीनंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती गठित करण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर बाविस्कर समिती गठित करण्यात आली. समितीने यासंबंधीचा अहवाल सादर केला आहे.