नागपूर विद्यापीठ : १५ ऑगस्टपर्यंत होणार कुलगुरूंची निवड ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:16 PM2020-07-14T22:16:15+5:302020-07-14T22:17:53+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु नियुक्तीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा अखेर सुरू झाला आहे. निवड समितीकडे या पदासाठी जवळपास १२५ अर्ज आले असून त्यांची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना जुलै महिन्यातच सादरीकरणाची संधी मिळण्याची शक्यता असून १५ऑगस्टपर्यंत कुलगुरूंची निवड होईल असे अंदाज वर्तविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु नियुक्तीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा अखेर सुरू झाला आहे. निवड समितीकडे या पदासाठी जवळपास १२५ अर्ज आले असून त्यांची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना जुलै महिन्यातच सादरीकरणाची संधी मिळण्याची शक्यता असून १५ऑगस्टपर्यंत कुलगुरूंची निवड होईल असे अंदाज वर्तविण्यात येत आहे.
डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवृत्त झाले होते. त्याअगोदरच मार्च महिन्यात निवड समितीने कुलगुरू पदासाठी इच्छुक असलेल्यांकडून अर्ज मागविले होते. २० एप्रिलपर्यंत त्यांना अर्ज पाठवायचे होते. परंतु ‘कोरोना’मुळे ‘लॉकडाऊन’ लागला आणि ही प्रक्रियेचा वेग मंदावला. त्यानंतर १५ जूनपर्यंत इच्छुकांना मुदतवाढ देण्यात आली होती. निवड समितीकडे अर्ज पोहोचले असून त्यांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. सुमारे १२५ अर्ज पोहोचले असून समिती सदस्य ‘ऑनलाईन’ माध्यमातून बैठका करत आहेत.
छाननी प्रक्रिया आटोपल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल व त्यांना सादरीकरणासाठी बोलविण्यात येईल. हे सादरीकरण प्रत्यक्ष होईल की ‘ऑनलाईन’ याबाबत समिती निर्णय करणार आहे. सर्वसाधारणत: २० ते २५ उमेदवारांचा यात समावेश असू शकतो. जुलै महिन्याच्या अखेरीसपर्यंत हे सादरीकरण होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या उमेदवारांचे सादरीकरण झाल्यानंतर यातून पाच अंतिम उमेदवारांची निवड करण्यात येईल व त्यांची मुलाखत घेण्यात येईल.
निवड समितीत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले, आयआयटी कानपूरचे संचालक प्रा. अभय करंदीकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे यांचा समावेश असून ‘आयआयटी-मुंबई’चे कुलसचिव डॉ.आर. प्रेमकुमार हे ‘नोडल’ अधिकारी आहेत. मुलाखती नेमक्या कधी होऊ शकतील यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी डॉ.आ.प्रेमकुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.