नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी दुसऱ्यांदा निलंबित; राज्यपाल रमेश बैस यांचा निर्णय
By आनंद डेकाटे | Published: July 4, 2024 07:56 PM2024-07-04T19:56:47+5:302024-07-04T19:56:51+5:30
यापूर्वी राज्यपालांनी २१ फेब्रुवारी रोजी कुलगुरू डॉ चौधरींना निलंबित केले होते.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या चौकशीवर अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिल्यावर राज्यपाल रमेश बैस यांनी डॉ. चौधरी यांना त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी राज्यपाल कार्यालयात बोलावले होते. यावेळी डॉ. चौधरींनी आपले लेखी उत्तर सादर केले असून दोन दिवसांची वैद्यकीय रजा मागितली होती. परंतु त्यांच्या या लेखी उत्तराने समाधान न झाल्याने राज्यपालांनी गुरुवारी कुलगुरू डॉ. चौधरींना दुसऱ्यांदा निलंबित केले. विशेष म्हणजे यापूर्वी राज्यपालांनी २१ फेब्रुवारी रोजी कुलगुरू डॉ चौधरींना निलंबित केले होते.
डॉ. सुभाष चौधरी यांच्या विरोधातील असलेल्या अनेक तक्रारींविरोधात राज्यपालांनी चौकशी समिती लावली होती. या समितीच्या अहवालाच्या आधारे राज्यपालांनी कारवाई केली आहे. यापूर्वीही चौधरींना निलंबित करण्यात आले होते. मात्र, न्यायालाने निलंबनाला स्थगिती दिल्यानंतर ते पुन्हा रूजू झाले. त्यानंतर पुन्हा राज्यपाल व कुलपती रमेश बैस यांनी चौधरी यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले होते. ही चौकशी पूर्ण झाली असून कुलपती यांनी चौधरी यांना स्पष्टीकरण देण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत नोटीस काढली. यानंतर चौधरी यांनी चौकशी प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणी सुभाष चौधरी यांच्या चौकशीवर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यपालांनी चौकशीसाठी बोलावले होते. डॉ. चौधरी यांच्या लेखी उत्तराने समाधान न झाल्याने राज्यपाल कारवाई केली आहे. राज्यपालांनी चौधरींना राजीनामा देण्यास सांगितले होते. मात्र, त्यासाठी चौधरींनी नकार दिल्याने राज्यपालांनी गुरुवारी त्यांना निलंबीत केले.