नागपूर विद्यापीठ कुलगुरू निवड समितीसाठी करंदीकर यांचे नाव निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:30 PM2019-11-18T22:30:08+5:302019-11-18T22:32:18+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. विद्यापीठाने कुलगुरूच्या निवडीसाठी बनविलेल्या समितीसाठी आयआयटी कानपूरचे निदेशक प्रा. अभय करंदीकर यांचे नाव सर्वसंमतीने निश्चित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. विद्यापीठाने कुलगुरूच्या निवडीसाठी बनविलेल्या समितीसाठी आयआयटी कानपूरचे निदेशक प्रा. अभय करंदीकर यांचे नाव सर्वसंमतीने निश्चित करण्यात आले. त्यांचे नाव कुलपती कार्यालयाकडे पाठविण्यात आले.
समितीच्या एका सदस्याची निवड करण्यासाठी सोमवारी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद व विद्वत् परिषदेची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीत प्रा. करंदीकर यांचे नाव व्यवस्थापन परिषदेचे वरिष्ठ सदस्य डॉ. राजेश भोयर यांनी प्रस्तावित केले. विष्णू चांगदे यांनी त्यांच्या नावाचे अनुमोदन केले. संक्षिप्त चर्चेनंतर त्यांच्या नावाच्या प्रस्तावावर मोहोर लावण्यात आली. आता राज्यपाल व कुलपती समितीचे अध्यक्ष त्यांचे नाव निश्चित करतील. समितीत एक अन्य सदस्य म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना सहभागी केले आहे. नियमानुसार निवड समितीचे गठन झाल्यानंतर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतात. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया एक महिना चालेल. पात्र उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. समितीकडून एकूण उमेदवारांपैकी पाच दावेदारांचे नाव राज्यपाल व कुलपती यांना पाठविण्यात येईल. या उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर त्यातील एका उमेदवाराची कुलगुरू म्हणून निवड करण्यात येईल. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपतो आहे. ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
बैठकीत उपस्थित नव्हते भावी उमेदवार
विद्यापीठात कुलगुरू पदासाठी अनेक दावेदार आहे. या दावेदारांपैकी आजच्या बैठकीत केवळ राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मोहन काशीकर यांना सोडल्यास कुणीही उपस्थित नव्हते. कुलगुरू पदासाठी असलेल्या दावेदारामध्ये विद्यापीठाचे कार्यकारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्यासह त्यांची पत्नी व अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख स्नेहा देशपांडे, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या मुख्य शाखेचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार, शासकीय विज्ञान संस्थेचे रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अंजली राहटगांवकर यांच्याही नावाचा समावेश आहे.