नागपूर विद्यापीठ; कुलगुरूंचे ‘ड्रीम’ अपूर्णच राहिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 07:00 AM2020-04-07T07:00:00+5:302020-04-07T07:00:06+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ मंगळवारी संपत आहे. डॉ. काणे यांचे परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून ‘५०:५०’ प्रणाली आणण्याचे स्वप्न होते. परंतु महाविद्यालयांचे सहकार्य न मिळाल्याने त्यांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ मंगळवारी संपत आहे. पदाची सूत्रे घेतल्यापासून डॉ. काणे यांचे परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून ‘५०:५०’ प्रणाली आणण्याचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी बरेच प्रयत्नदेखील केले. परंतु महाविद्यालयांचे सहकार्य न मिळाल्याने त्यांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले. दरम्यान, पाच वर्षांच्या कार्यकाळात परीक्षा यंत्रणा रुळावर आणून विद्यापीठाला ‘टेक्नोसॅव्ही’ करण्यात ते यशस्वी झाले.
डॉ. काणे यांनी सूत्रे हाती घेतली होती तेव्हा विद्यापीठाची परीक्षा यंत्रणा कोलमडली होती. डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे प्र-कुलगुरूपदाची धुरा देण्यात आली व डॉ. काणे त्यानंतर सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहिले. डॉ. काणे यांनादेखील परीक्षा नियंत्रक म्हणून काम करण्याचा अनुभव होताच. पाच वर्षांच्या कालावधीत ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाला सुरुवात झाली व निकालांचा वेग वाढला. विद्यापीठात बरेच ‘ई-रिफॉर्म्स’ झाले. विशेष म्हणजे, या कालावधीत विद्यापीठातील ‘पीएचडी’ची बजबजपुरी थांबली व नोंदणी प्रक्रिया कडक करण्यात आली. प्रशासनातदेखील बरेच बदल दिसून आले. ५० टक्के परीक्षा महाविद्यालयांनी घ्याव्यात, असा त्यांचा मानस होता. प्राधिकरणांच्या बैठकात यावर चर्चादेखील झाली. परंतु विरोधामुळे हा प्रस्ताव बारगळल्या गेला.
अतिक्रमणमुक्त झाली जमीन
नागपूर विद्यापीठाची ‘कॅम्पस’लगतच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण होते. ७.७९ एकर जागेवर रेस्टॉरन्ट्स, हॉटेल्स थाटले होते. न्यायालयातदेखील हे प्रकरण होते. कुलगुरूंनी प्रशासनाच्या मदतीने याचा पाठपुरावा केला व ही जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात यश मिळविले.
विद्यापीठाला मिळाली नवीन इमारत
विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे निर्माण डॉ.काणे यांच्या कार्यकाळातच झाले. २६ सप्टेंबर २०१५ रोजी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन पार पडले. अखेर १९ डिसेंबर रोजी इमारतीचे उद्घाटन झाले व ९ दशके जुन्या इमारतीतून विद्यापीठाचा प्रशासकीय कारभार नवीन इमारतीत हलविण्यात आला.
कुलगुरू लिहिणार पुस्तक
सेवानिवृत्त झाल्यानंतर मी स्वत:च्याच आयुष्यातील अनुभवांवर पुस्तक लिहिणार असल्याचे कुलगुरूंनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. १९८४ साली सांख्यिकीशास्त्र विभागात रुजू झाल्यापासून ते परीक्षा नियंत्रक, ‘आयक्यूएसी’ संचालक, कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळत असताना आलेल्या अनुभवांचा त्यात समावेश असेल. जर त्यांनी कुणाच्याही दबावात न येता पुस्तक लिहिले तर विद्यापीठातील अनेक बाबी समोर येऊ शकतात. दरम्यान, पाच वर्षांचा कार्यकाळ हा समाधानकारक राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘ओपन डोअर पॉलिसी’चे धोरण बदलले
डॉ. काणे यांनी कार्यकाळाच्या सुरुवातीला ‘ओपन डोअर पॉलिसी’ असेल, अशी घोषणा केली होती. कुठलीच प्राधिकरणे नसल्याने अडीच वर्षे तरी त्यांच्याच हाती कारभार होता. त्यानंतर मात्र त्यांचे हे धोरण काहीसे बदलत गेले. विधिसभेच्या बैठकीत प्रसारमाध्यमांना प्रवेश देण्यासदेखील नकार देण्यात आला. दरम्यान, त्यांच्यावर काही अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचेदेखील आरोप झाले.
उल्लेखनीय कामगिरी
-‘ऑनलाईन’ परीक्षा प्रणाली
- परीक्षा विभागात ‘ऑनस्क्रीन’ मूल्यांकन केंद्राची निर्मिती.
-अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रश्नपत्रिकांची ‘ऑनलाईन डिलिव्हरी’
-‘पीएचडी’ नोंदणीच्या प्रक्रिया कडक
-विद्यार्थ्यांकडून विषयनिहाय शुल्क घेण्याची सुरुवात
-‘कॅम्पस’मध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया
-पदवी अभ्यासक्रमांसाठी समान वेळापत्रक
-डीएस्सी व डीलिट पदव्यांसाठी नवी नियमावली
-विद्यापीठाची सुरक्षा वाढविली
-वसतिगृहांत शिस्त आणली
-पदव्युत्तर विभागात कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती