नागपूर विद्यापीठ : परीक्षा विभागात हवेत १०० सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:35 AM2019-03-07T00:35:35+5:302019-03-07T00:36:11+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा परीक्षा विभाग संवेदनशील मानण्यात येतो. येथे परीक्षा तसेच विद्यापीठाशी संबंधित अनेक गोपनीय दस्तावेज असतात. त्यामुळे येथील सुरक्षेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य देणे अपेक्षित आहे. एकीकडे प्रशासकीय इमारत परिसरात जागोजागी ‘सीसीटीव्ही’असताना परीक्षा विभागात मात्र एकही कॅमेरा काम करत नसल्याचे चित्र आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा विभागात १०० ‘सीसीटीव्ही’कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे व तसा प्रस्तावदेखील वर्षभरापूर्वी देण्यात आला होता. मात्र लेटलतिफीमुळे अद्यापपर्यंत एकही सीसीटीव्ही लागू शकलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा परीक्षा विभाग संवेदनशील मानण्यात येतो. येथे परीक्षा तसेच विद्यापीठाशी संबंधित अनेक गोपनीय दस्तावेज असतात. त्यामुळे येथील सुरक्षेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य देणे अपेक्षित आहे. एकीकडे प्रशासकीय इमारत परिसरात जागोजागी ‘सीसीटीव्ही’असताना परीक्षा विभागात मात्र एकही कॅमेरा काम करत नसल्याचे चित्र आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा विभागात १०० ‘सीसीटीव्ही’कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे व तसा प्रस्तावदेखील वर्षभरापूर्वी देण्यात आला होता. मात्र लेटलतिफीमुळे अद्यापपर्यंत एकही सीसीटीव्ही लागू शकलेला नाही.
मागील आठवड्यात गोपनीय विभागातून लाख रुपयाची रोकड गायब झाली असल्याने विद्यापीठात खळबळ उडालेली आहे. ही रक्कम नेमकी चोरी झाली की हिशेबात गडबड झाली याची चाचपणी सुरू आहे. मात्र विभागातील एकही ‘सीसीटीव्ही’ सुरू नसल्याने यात अडचणी येत आहेत. २०१४ साली परीक्षा विभागात ‘सीसीटीव्ही’ लावण्यात आले होते. मात्र यातील काही ‘सीसीटीव्ही’कॅमेरे खराब झाले. तर नूतनीकरण सुरू असताना वायरिंग खराब झाल्याने इतर कॅमेरे बंदच झाले होते. हे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे जुन्या तंत्रज्ञानाचे होते. नवीन ‘सीसीटीव्ही’ लावणे व वायरिंगची दुरुस्ती यासाटी सुमारे ५ ते ६ लाखांचा खर्च अपेक्षित होता. यापेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ‘सीसीटीव्ही’ लावल्यास तो खर्च ७ ते ८ लाखांच्या घरातच जात होता. परीक्षा विभागाची आवश्यकता लक्षात घेता मागील वर्षी १०० ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या खरेदीचा प्रस्ताव प्रशासनासमोर सादर करण्यात आला. यासाठी नव्याने गठित करण्यात आलेल्या माहिती व तंत्रज्ञान मंडळाच्या परवानगीची आवश्यकता होती. मात्र अद्यापदेखील ही मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे प्रस्तावाची फाईल धूळखातच पडलेली आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
प्रशासकीय इमारतीत ‘आॅल इज वेल’
परीक्षा विभाग संवेदनशील असताना केवळ सुरक्षारक्षकांच्या भरवशावर येथे सुरक्षा सोडण्यात आली आहे. मात्र ‘सीसीटीव्ही’नसल्याने येथील गैरप्रकार वाढले आहेत. दुसरीकडे प्रशासकीय इमारतीत मात्र जागोजागी ‘सीसीटीव्ही’ लागले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षकदेखील आहेत. परीक्षा विभागाकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.