नागपूर विद्यापीठ : चहा-कॉफी घोटाळेबाजांवर कारवाई कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 08:33 PM2019-11-29T20:33:20+5:302019-11-29T20:34:08+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील चहा-कॉफी घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशी समितीने अखेर अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील चहा-कॉफी घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशी समितीने अखेर अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. या अहवालातून विद्यापीठात देयकांच्या नावाने कसा गैरप्रकार सुरू होता यावर प्रकाश टाकण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणातील घोटाळेबाजांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर विद्यापीठाच्या विद्याशाखा विभागात मे महिन्यात अभ्यास मंडळाच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. त्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या तीन सदस्यांना विद्याशाखेकडून चहा देण्यात आला. चहा, कॉफी, नाश्त्याचा एकूण खर्चच दीड लाख रुपयांच्या घरात दाखविण्यात आला. याशिवाय या कालावधीत झालेल्या सहा ते सात बैठकांमध्ये सदस्यांनी पिलेल्या ‘पॅकबंद’ पाणी बॉटल्सचे देयक २४ हजार इतके सादर करण्यात आले आहे. ही बाब वित्त विभागाच्या समोर आल्यानंतर कुलगुरूंना याची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ ही देयके थांबविली. त्यानंतर एलआयटीचे संचालक डॉ.राजू मानकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत एकूण सहा सदस्य होते. या समितीला चौकशीची कालमर्यादा ठेवण्यात आलेली नाही, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले होते.
चौकशी समितीने प्रशासनाकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालातून अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एका लिपीकाची चौकशी व्हायची बाकी होती. परंतु तो दीर्घकालीन रजेवर गेला असल्याने चौकशी समितीचे काम खोळंबले. मात्र त्याने दिलेली माहिती ही चौकशी समितीच्या सदस्यांनादेखील हादरविणारी ठरली. चहा-कॉफीची पक्की देयके नव्हतीच व विद्यापीठात हीच परंपरा असल्याचे त्याने सांगितले. याशिवाय कच्चे देयकदेखील नसल्याचे त्याने सांगितले. जर लाखो रुपयांची देयकांचा कारभार अशा पद्धतीने चालत असेल तर विद्यापीठात असे किती घोटाळे झाले असतील असा प्रश्न समोर येत आहे.
नेमके दोषी कोण ?
संबंधित लिपीकाने दिलेल्या माहितीवरुन प्रकरणात नेमके दोषी कोण आहे असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. जर पक्की देयके नसतील तर अशी परंपरा कधीपासून विद्यापीठात सुरू आहे, कुणीच यावर आक्षेप का घेतला नाही या मुद्यांवरदेखील नवीन चौकशी लागू शकते. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही.