नागपूर विद्यापीठ : कन्हानच्या शाळेची जमीन परत कधी घेणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:11 AM2019-01-25T00:11:54+5:302019-01-25T00:13:10+5:30
कन्हान येथील ‘बिहारीलाल खंडेलवाल ट्रस्ट’ला शाळा चालविण्यासाठी दिलेली जागा परत घेण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ऑगस्ट २०१८ मध्ये घेतला होता. विद्यापीठाने केवळ शाळेला नोटीस बजावली आहे. मात्र ही जमीन परत घेण्यासंदर्भात ठोस कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कन्हान येथील ‘बिहारीलाल खंडेलवाल ट्रस्ट’ला शाळा चालविण्यासाठी दिलेली जागा परत घेण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ऑगस्ट २०१८ मध्ये घेतला होता. विद्यापीठाने केवळ शाळेला नोटीस बजावली आहे. मात्र ही जमीन परत घेण्यासंदर्भात ठोस कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कन्हान येथे नागपूर विद्यापीठाची ११.८६ एकर जागा आहे.१९७३ साली ही जागा बिहारीलाल खंडेलवाल ट्रस्टला शाळा चालविण्यासाठी भाडेपट्टीवर देण्यात आली. या शाळेत सद्यस्थितीत पंधराशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. १९ जुलै २०१३ रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या ट्रस्टची ‘लीज’ वाढविण्यासंदर्भातील प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. मात्र २०१३ पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीत ‘ट्रस्ट’ शाळेसाठी इतरत्र व्यवस्था करेल, असे या करारपत्रात नमूद होते. मात्र ‘ट्रस्ट’ने ही अट मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे विद्यापीठाने २०१३ पासून ‘ट्रस्ट’कडून भाडेच स्वीकारले नाही व कायदेशीर सल्ला घेतला. २ मार्च २०१५ साली झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ही जागा रिकामी करण्यासाठी ‘ट्रस्ट’ला नोटीस पाठविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आणि २९ जून २०१५ रोजी ही नोटीस पाठविण्यात आली. १६ एप्रिल २०१६ रोजी विद्यापीठाने ही जागा रिकामी करण्यासंदर्भात ‘ट्रस्ट’ला कायदेशीर नोटीस पाठविली. २०१३ पासून या जागेसंदर्भात कुठल्याही भाडेपट्टीचा करार अस्तित्वात नाही.
दरम्यानच्या काळात या ‘ट्रस्ट’ची ‘लिज’ वाढविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. यावर निर्णय घेण्यासंदर्भात हा विषय ऑगस्ट २०१८ मध्ये झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आला होता. ही जागा परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशा आशयाचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता.
कन्हान येथील सुमारे अडीच एकरची जागा ही ‘एनएचएआय’ला राष्ट्रीय महामार्ग बांधकामासाठी देण्यात आली आहे. उर्वरित जागी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. तसेच ही जागा नदीच्या काठी असल्याने ‘सेलिकल्चर’ व ‘बायोटेक्नॉलॉजी’ विभागाला विविध प्रकल्प राबविण्यासाठीदेखील जागा देण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले होते.
मात्र अद्यापदेखील जागेचा ताबा घेण्यासंदर्भात कुठलीही ठोस पावले उचलण्यात आली नव्हती. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने शाळा प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.