नागपूर विद्यापीठ : राष्ट्रसंतांच्या मर्यादित साहित्याचाच अभ्यास का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 09:09 PM2020-02-03T21:09:25+5:302020-02-03T21:10:08+5:30
आश्चर्याची बाब म्हणजे इयत्ता नववीच्या पुस्तकात राष्ट्रसंतांची जी कविता आहे, तीच कविता ‘बीए’ प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमातदेखील आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांपर्यंत राष्ट्रसंतांचे विविधांगी साहित्य पोहोचणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नाव राष्ट्रसंतांच्या नावावर असून त्यांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन वगळता इतर अभ्यासक्रमांत त्यांच्या साहित्याची मर्यादित ओळखच विद्यार्थ्यांना करून देण्यात येते. आश्चर्याची बाब म्हणजे इयत्ता नववीच्या पुस्तकात राष्ट्रसंतांची जी कविता आहे, तीच कविता ‘बीए’ प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमातदेखील आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांपर्यंत राष्ट्रसंतांचे विविधांगी साहित्य पोहोचणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तुकडोजी महाराजांनी मराठी भाषेत दीड हजारांहून भजने, हिंदी-मराठी श्लोक, अभंगगाथा, ग्रामगीता इत्यादी साहित्य रचले. ‘या झोपडीत माझ्या’ ही त्यांची प्रसिद्ध कविता आहे. जुन्या काळी ही कविता तिसऱ्या व त्यानंतरच काही कालावधीत पाचव्या वर्गाच्या अभ्यासक्रमाला होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने नववीच्या अभ्यासक्रमाला ही कविता ठेवली आहे. शालेय अभ्यासक्रमात ही कविता असताना नागपूर विद्यापीठाने तीच कविता ‘बीए’ प्रथम वर्षाच्या आवश्यक मराठी विषयासाठी ठेवली आहे. या अभ्यासक्रमाला मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात ही कविता अभ्यासाला आहे. जर विद्यार्थी शालेय पातळीवर राष्ट्रसंतांची कविता शिकत असतील व त्यांनी रचलेले विपुल साहित्य उपलब्ध आहे, तर मग तीच ती कविता परत पदवी अभ्यासक्रमात ठेवण्यात का आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नववीच्या पुस्तकातदेखील कडव्यांची अदलाबदली
नववीच्या ‘कुमारभारती’ या पुस्तकात २२ व्या पानावर ‘या झोपडीत माझ्या...’ ही कविता आहे. या कवितेच्या तेरा कडव्यांपैकी सातच कडवे यात देण्यात आले आहेत. त्यातही कडवे मागेपुढे करण्यात आले आहे.
अभ्यास मंडळाला साहित्याची ओळख नाही का ?
यासंदर्भात श्री गुरुदेव युवामंचचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्या विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने अध्यासन व ‘एम.ए.’ विचारधारा अभ्यासक्रम आहे तेथे हीच कविता अभ्यासक्रमात का लावण्यात आली. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळात तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातील विद्वानांना राष्ट्रसंतांच्या इतर साहित्याची ओळख नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.