नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ८ मार्चपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 01:14 PM2021-03-04T13:14:54+5:302021-03-04T13:15:57+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांसाठी अखेर मुहूर्त निघाला आहे. ८ मार्चपासून परीक्षांना सुरुवात होणार असून, अगोदर प्रात्यक्षिक परीक्षा होतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांसाठी अखेर मुहूर्त निघाला आहे. ८ मार्चपासून परीक्षांना सुरुवात होणार असून, अगोदर प्रात्यक्षिक परीक्षा होतील. त्यानंतर २० मार्चपासून लेखी परीक्षांना सुरुवात होईल. बुधवारी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. संपूर्ण परीक्षा ‘ऑनलाइन’ माध्यमातून चार टप्प्यात घेतल्या जातील.
‘कोरोना’मुळे २०२० च्या उन्हाळी परीक्षा जास्त लांबल्या होत्या. या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर हिवाळी परीक्षांचे नियोजन करण्यास सुरुवात झाली होती. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, हिवाळी परीक्षेचे आयोजन दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर करण्यात येणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा महाविद्यालय व शैक्षणिक विभागांच्या पातळीवरच होतील. महाविद्यालय व विभागांच्या शिक्षकांनाच परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागतील व त्यांनाच परीक्षा घ्यावी लागेल. तर पदवी परीक्षा व त्यातही १०० हून अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या विषयांची परीक्षा विद्यापीठ घेईल. ज्या विषयांमध्ये १०० हून कमी विद्यार्थी आहेत, त्यांची परीक्षा महाविद्यालयांना घ्यावी लागेल. संबंधित प्रश्नपत्रिका महाविद्यालयातील शिक्षकांना तयार कराव्या लागतील व परीक्षादेखील तेच घेतील. परीक्षांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रथम, तृतीय, पाचव्या, सातव्या व नवव्या सत्राचे विद्यार्थी सहभागी होतील. प्रात्यक्षिक परीक्षा २० मार्चपर्यंत चालतील तर लेखी परीक्षा ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येतील. विद्यापीठाच्या परीक्षा चार टप्प्यांत घेण्यात येतील. एक टप्पा पूर्ण करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमांच्या परीक्षा नंतर होणार
परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार ‘कॅप’ अंतर्गत प्रवेश झालेल्या अभियांत्रिकी, बीएड, एलएलबी, बीटेक, बीफार्म या अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता होणार नाही. या अभ्यासक्रमांच्या परीक्षांची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. त्यांचे वेळापत्रक नंतर घोषित करण्यात आलेले नाही. दरम्यान ‘ऑनलाइन’ परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी कोणत्या ‘एजंसी’ला देण्यात आलेली आहे, हे विद्यापीठाने स्पष्ट केलेले नाही.
असे राहणार टप्पे
पहिला टप्पा : बहि:शाल व उन्हाळी २०२० मधील अनुत्तीर्ण विद्यार्थी
दुसरा टप्पा : बीएसस्सी, बीए व इतर पदवी अभ्यासक्रमांच्या तृतीय, पाचव्या व सातव्या सत्राची परीक्षा
तिसरा टप्पा : व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राची परीक्षा
चौथा टप्पा : उर्वरित सर्व अभ्यासक्रमांची परीक्षा
महाविद्यालयांचे काम वाढणार
विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या या निर्णयाने महाविद्यालयांचे काम वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून विरोध होऊ शकतो. विशेषत: विनाअनुदानित महाविद्यालयांकडून जास्त विरोध होण्याची शक्यता आहे. अनेक महाविद्यालयांत नियमित शिक्षक नाहीत. ‘लॉकडाऊन’नंतर अनेकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. अ़नुदानित महाविद्यालयांनी अगोदरच विद्यापीठाच्या ५०:५० प्रणालीचा विरोध केला होता.