नागपूर विद्यापीठ; मिक्स मोडमध्ये होणार हिवाळी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 10:17 AM2021-02-04T10:17:40+5:302021-02-04T10:18:11+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या २०२० सालच्या उन्हाळी परीक्षा कोरोनामुळे प्रचंड लांबल्या. विद्यापीठाकडून आता हिवाळी परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या २०२० सालच्या उन्हाळी परीक्षा कोरोनामुळे प्रचंड लांबल्या. विद्यापीठाकडून आता हिवाळी परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे. अद्यापही कोरोनावर पूर्णतः नियंत्रण आले नसल्याने ऑनलाईन व ऑफलाईन अशा मिक्स मोडमध्ये परीक्षा घेण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी दिली.
कोरोनामुळे शैक्षणिक सत्राला फटका बसला व ऑगस्टमध्ये विषम सत्रांचे वर्ग सुरू झाले. बहुतांश विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असून विद्यार्थी आता परीक्षेची प्रतिक्षा करत आहेत. यासंदर्भात राज्य शासनाकडून कुठलेही दिशानिर्देश आलेले नसले तरी परीक्षांबाबतचा निर्णय विद्यापीठ पातळीवरच घेण्याची सूचना आली आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाने हिवाळी परीक्षा घेण्यासंदर्भात पावले उचलली आहेत.मिक्स मोडमध्ये परीक्षा झाली तर त्यामुळे शहरी व ग्रामीण दोन्ही भागांतील विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील. यासंदर्भात विद्वत्त परिषद व परीक्षा मंडळाची मंजुरी घेण्यात येण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणतः काही विषयांच्या परीक्षा या दीड महिन्यांहून अधिक काळ चालतात. ही बाब लक्षात घेता शनिवारी व रविवारीदेखील परीक्षा घेण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले.
बीएडची परीक्षा २२ फेब्रुवारीपासून
दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे बीएड अंतिम वर्षाची परीक्षा स्थगित करण्यात आली होती. त्यातला एक पेपर ऑफलाईन झाला होता. विद्यापीठाने उर्वरित पेपर २२ फेब्रुवारीपासून आयोजित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे यांनी सांगितले.