नागपूर विद्यापीठाचा शैक्षणिक ‘कॅलेंडर’चा मुहूर्त चुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:24 AM2018-06-19T11:24:09+5:302018-06-19T11:24:15+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता जाहीर केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार १५ जूनपासून विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू होणे अपेक्षित होते. परंतु बहुतांश महाविद्यालये सुनसान असल्याचे चित्र दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता जाहीर केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार १५ जूनपासून विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू होणे अपेक्षित होते. परंतु अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असून सत्र सुरू झाल्यावरदेखील बहुतांश महाविद्यालये सुनसान असल्याचे चित्र दिसून आले. अशा स्थितीत ९० दिवसांच्या नियमाचे पालन नेमके कसे होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाच्या निकालांनी वेग पकडला आहे. यंदादेखील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनेक परीक्षांचे निकाल लागले आहेत. विद्यापीठाने जारी केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार वार्षिक प्रणालीच्या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र १५ जून ते १५ आॅक्टोबर तर दुसरे सत्र १५ नोव्हेंबर ते ३० एप्रिल या कालावधीत होणार आहे. मात्र निकाल लागले असूनदेखील अनेक वर्ग अद्याप सुरू झालेले नाहीत. ‘लोकमत’ने शहरांतील निरनिराळ्या महाविद्यालयांत जाऊन बघितले असता बऱ्याच ठिकाणी शांतता दिसून आली. ‘कॅम्पस’मधील काही विभागांत मात्र वर्ग सुरू झालेले दिसून आले.
सत्र पूर्ण होणार कसे?
सेमिस्टर पॅटर्ननुसार महाविद्यालयांना आॅक्टोबर महिन्यापर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. यूजीसीच्या नियमांनुसार सेमिस्टर सत्रात किमान ९० दिवसांचे शैक्षणिक सत्र व्हायला हवे. मात्र निकाल लागूनदेखील वर्ग सुरू झालेले नाहीत. अशा स्थितीत सत्र कसे पूर्ण होणार हादेखील एक प्रश्नच आहे. कागदावर जरी १५ जून रोजी शैक्षणिक सत्र सुरू होणार असले, तरी प्रत्यक्ष वर्गखोल्यांत विद्यार्थी येण्यास विलंब होणार हे निश्चित असल्याचे महाविद्यालयांकडूनच सांगण्यात येत आहे.
६९ टक्के निकाल जाहीर
तारखेत विद्यापीठातील १ हजार २७८ पैकी ८७७ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. जाहीर झालेल्या निकालांची टक्केवारी ही सुमारे ६९ टक्के इतकी आहे. पुढील २ ते ३ दिवसांत हा आकडा साडेनऊशेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. अनेक विषयांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले असून लवकरात लवकर निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांनी दिली.