अभ्यास मंडळ निवडणुकीतील वाद सर्वोच्च न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 09:50 PM2018-02-13T21:50:52+5:302018-02-13T21:56:02+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र व रसायनशास्त्र अभ्यास मंडळ निवडणुकीतील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे देण्यात आलेल्या निर्णयाविरुद्ध विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र व रसायनशास्त्र अभ्यास मंडळ निवडणुकीतील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे देण्यात आलेल्या निर्णयाविरुद्ध विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे.
२३ नोव्हेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने वाडी येथील जवाहरलाल नेहरू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मनीषा भातकुलकर व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. नितीन कोंगरे यांचा मतदार यादीत समावेश करण्याचा निर्णय दिला होता. हा निर्णय देताना नागपूर विद्यापीठाचे सर्व वादग्रस्त आदेश रद्द करण्यात आले होते. त्यावर नागपूर विद्यापीठाचा आक्षेप आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय अवैध असून तो निर्णय रद्द करण्यात यावा, अशी विनंती विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
निवडणुकीच्या मतदार यादीसाठी महाविद्यालयाने डॉ. कोंगरे व डॉ. भातकुलकर यांची नावे विद्यापीठाकडे पाठविली होती. त्यावर महाविद्यालयातील प्रा. आर. के. वानारे व प्रा. ए. यू. देवरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप घेतले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप मंजूर करून डॉ. भातकुलकर यांच्याऐवजी प्रा. देवरे तर, डॉ. कोंगरे यांच्याऐवजी प्रा. वानारे यांचा मतदार यादीत समावेश केला. त्याविरुद्ध डॉ. कोंगरे व डॉ. भातकुलकर यांनी कुलगुरूंकडे अपील केले होते. कुलगुरूंनी त्यांचे अपील खारीज करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय कायम ठेवला. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने डॉ. कोंगरे व डॉ. भातकुलकर यांची याचिका मंजूर करून निवडणूक निर्णय अधिकारी व कुलगुरू यांचे वादग्रस्त आदेश रद्द केले आणि डॉ. कोंगरे व डॉ. भातकुलकर यांचा मतदार यादीत समावेश करण्याचे निर्देश दिले.
कोंगरे, भातकुलकरांना नोटीस
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी विद्यापीठाच्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर डॉ. कोंगरे व डॉ. भातकुलकर यांना नोटीस बजावून सहा आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. विद्यापीठातर्फे अॅड. सुधीर वोडितेल यांनी बाजू मांडली.