पाच वर्षांत नागपूर विद्यापीठाच्या खर्चात ११० कोटींनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 10:25 AM2021-07-22T10:25:18+5:302021-07-22T10:28:20+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ऑनलाइन सुधारणांवर जास्त भर देण्यात येत असला तरी मागील पाच वर्षांत विद्यापीठाचा खर्च तब्बल ११० कोटींनी वाढला आहे.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ऑनलाइन सुधारणांवर जास्त भर देण्यात येत असला तरी मागील पाच वर्षांत विद्यापीठाचा खर्च तब्बल ११० कोटींनी वाढला आहे. पाच वर्षांत वेतन वगळता विविध बाबींवर बाराशे कोटींहून अधिक निधी खर्च झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पायाभूत सुविधांची वाढ करण्यासाठी यातील केवळ ८.८० टक्के इतकीच रक्कम खर्च करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांवरील इतका कमी आकडा लक्षात घेता विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा कशा उपलब्ध होतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२०१५-१६ या वर्षात शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन वगळता १९२ कोटी ६४ लाख २९ हजार रुपयांचा खर्च झाला होता. २०१९-२० मध्ये यात ५७.६१ टक्क्यांनी वाढ झाली व खर्च ३०३ कोटी ६२ लाख ५६ हजारांवर गेला. २०१८-१९ मध्ये सर्वाधिक ३४७ कोटी १ लाख ७७ हजार इतकी रक्कम खर्च झाली. दरवर्षी नव्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर मात्र फारच कमी रक्कम खर्च करण्यात आली. पाच वर्षांतील एकूण खर्च हा १०८ कोटी १५ लाख १३ हजार इतका ठरला. २०१५-१६ साली एकूण खर्चाच्या तुलनेतील आकडा केवळ १६ कोटी ६४ लाख ९७ हजार इतका होता व ही टक्केवारी ८.६४ टक्के इतकीच होती, तर २०१९-२० मध्ये पायाभूत सुविधांच्या वाढीवर १६ कोटी ८ लाख २८ हजारांची रक्कम खर्च झाली व खर्चाची टक्केवारी घटून ५.३० टक्के इतकी झाली. काळासोबत पायाभूत सुविधांवरील खर्च वाढणे अपेक्षित होते. मात्र, २०१५-१६ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये पायाभूत सुविधांवरील खर्चातदेखील ३.४० टक्क्यांनी घट झाली.
पुस्तक व ई-जर्नल्ससाठी केवळ साडेतीन कोटींचा खर्च
विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके व ई-जर्नल्स आवश्यक संख्येत उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मात्र, नागपूर विद्यापीठाने याकडे फार गंभीरतेने पाहिलेले नाही. पाच वर्षांत विविध बाबींवर बाराशे कोटींचा खर्च झाला असताना पुस्तके व ई-जर्नल्सच्या खरेदीसाठी केवळ साडेतीन कोटींचाच खर्च करण्यात आला. २०१५-१६ साली सर्वाधिक १ कोटी ५२ लाख ४ हजार रुपये खर्च झाले.