नागपूर विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलण्याचे ‘व्हिजन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:36 PM2018-09-21T15:36:32+5:302018-09-21T15:38:21+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत् विकास आराखड्याला अखेर राज्य शासनातर्फे गठित ‘माहेड’तर्फे मंजुरी देण्यात आली आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत नागपूर विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलविण्याचे ‘व्हिजन’ या आराखड्यातून मांडण्यात आले आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत् विकास आराखड्याला अखेर राज्य शासनातर्फे गठित ‘माहेड’तर्फे मंजुरी देण्यात आली आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत नागपूर विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलविण्याचे ‘व्हिजन’ या आराखड्यातून मांडण्यात आले आहे. मूलभूत सुविधा, दर्जा यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासोबतच काळाची गरज ओळखत उद्योगक्षेत्राशी सुसंगत अशी पावले उचलण्याचा संकल्प यातून करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील ‘रँकिंग’मध्ये पहिल्या ५० मध्ये येण्यासाठी विद्यापीठ येत्या पाच वर्षांत जोर लावणार आहे. विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाने प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली बृहत् आराखडा तयार केला.
यानिमित्त डॉ. प्रमोद येवले यांच्याशी ‘लोकमत’ने विशेष संवाद साधला आणि आराखड्यातील नेमकी वैशिष्ट्ये जाणून घेतली.
ऐतिहासिक ठरेल बृहत् आराखडा
आतापर्यंत बृहत् आराखड्याच्या नावाखाली डोळे मिटून नवीन महाविद्यालये व अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात यायची. शासनाचा फारसा सहभाग नसायचा. मात्र यंदा शासनाने बृहत् आराखड्यासंदर्भात पुढाकार घेतला. मागील सहा महिन्यांपासून आमची तयारी सुरू होती. विद्यापीठ पातळीवर डॉ. विनायक देशपांडे यांची मसुदा समिती, राज्य पातळीवरील डॉ. के. बी. पाटील यांची समिती यांनी मौलिक परिश्रम घेतले. राज्य पातळीवरील समितीच्या तर सहा बैठकी झाल्या. यंदाच्या बृहत् आराखड्यामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टींवर जास्त भर देण्यात आला आहे. तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सामाजिक व तांत्रिक आवश्यकता लक्षात घेऊन, स्थानिक संसाधनांचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल यावरदेखील लक्ष देण्यात आले आहे, असे डॉ. येवले यांनी सांगितले.
बृहत् आराखड्याची विशेषता
राष्ट्रीय ‘रॅकिंग’मध्ये पहिल्या ५० मध्ये स्थान मिळविण्याचे ‘टार्गेट
‘जीईआर’ वाढविण्यावर भर
४१७ महाविद्यालयांचे ‘नॅक’ मूल्यांकन
प्रत्येक जिल्ह्यात उपकेंद्र
३० महाविद्यालये व चार विभागांना स्वायत्तता
‘पेटंट’ची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न
३५० ‘प्लेसमेंट सेल’ची स्थापना
२०० हून अधिक कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचा समावेश
२०२४ पर्यंत ३० स्वायत्त महाविद्यालये
बृहत् आराखड्यात महाविद्यालयांच्या दर्जावर भर देण्यात आला आहे. नागपूर विद्यापीठात सहा स्वायत्त महाविद्यालये आहेत. मात्र दर्जा वाढविण्यासाठी ही संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे बृहत् आराखड्यात २०१४ पर्यंत ३० स्वायत्त महाविद्यालयांचे ‘टार्गेट’ ठेवण्यात आले असल्याचे डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.