नागपूर विद्यापीठ वसतिगृह घोटाळा : अखेर प्रकाश शेडमाके निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 09:41 PM2018-08-01T21:41:09+5:302018-08-01T21:43:39+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी ‘वॉर्डन’ प्रकाश शेडमाकेला अखेर निलंबित करण्यात आले आहे. मंगळवारी यासंदर्भातील निर्देश कुलगुरूंनी जारी केले. शेडमाकेने वसतिगृहाच्या खात्यातील १२ लाख ५५ हजार रुपयांच्या निधीचा अपहार केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी ‘वॉर्डन’ प्रकाश शेडमाकेला अखेर निलंबित करण्यात आले आहे. मंगळवारी यासंदर्भातील निर्देश कुलगुरूंनी जारी केले. शेडमाकेने वसतिगृहाच्या खात्यातील १२ लाख ५५ हजार रुपयांच्या निधीचा अपहार केला होता.
नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात प्रवेश देत असताना विद्यार्थ्यांकडून ‘मेस डिपॉझिट’च्या नावाखाली प्रत्येकी दोन हजार रुपये घेण्यात येतात. हे शुल्क एका विशिष्ट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते व त्या खात्यातून पैसे काढण्याचे कुठलेही अधिकार ‘वॉर्डन’कडे नसतात. माजी ‘वॉर्डन’ डॉ. प्रकाश शेडमाकेने या बँक खात्यातून परस्पर ही रक्कम काढली, अशा तक्रारी विद्यापीठाला प्राप्त झाल्या. ही बाब उघडकीस आल्यानंतर विद्यापीठाने यासंदर्भात वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती.
चौकशी समितीसमोर प्रकाश शेडमाकेने केवळ एकदाच उपस्थिती लावली व तेव्हादेखील केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेरपर्यंत आपले लेखी स्पष्टीकरण दिलेच नाही. विद्यापीठाने वारंवार संधी देऊनदेखील शेडमाकेने चौकशीला येण्याचे टाळले. अखेर चौकशी समितीने घोटाळ्याचा ठपका लावत अहवाल कुलगुरूंना सोपविला.
चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारावर कुलगुरूंनी शेडमाकेला निलंबित केले. १२ लाख ५५ हजार रुपयांच्या निधीची वसुली करण्यासाठी विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले.