नागपूर विद्यापीठाचे ज्ञानस्रोत केंद्र झाले ‘बचत केंद्र’; निधी असूनदेखील पुस्तकखरेदीत हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 09:51 PM2022-03-24T21:51:03+5:302022-03-24T21:51:37+5:30

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राला पुस्तक खरेदी व इतर बाबींसाठी भरघोस तरतूद करण्यात आली असली तरी, गेल्या चार वर्षांपासून विद्यापीठात पुस्तक खरेदी झाली नसल्याचे वास्तव आहे.

Nagpur University's knowledge center became 'Bachat Kendra'; Despite having funds, he is reluctant to buy books | नागपूर विद्यापीठाचे ज्ञानस्रोत केंद्र झाले ‘बचत केंद्र’; निधी असूनदेखील पुस्तकखरेदीत हात आखडता

नागपूर विद्यापीठाचे ज्ञानस्रोत केंद्र झाले ‘बचत केंद्र’; निधी असूनदेखील पुस्तकखरेदीत हात आखडता

Next
ठळक मुद्देदोन वर्षांत तरतुदीच्या १ टक्का रकमेचीही पुस्तक खरेदी नाही

 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वाचनालयातील कारभारावर काही वर्षांअगोदर ‘कॅग’ने कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. मात्र तरीदेखील विद्यापीठाला जाग आलेली नाही. ज्ञानस्रोत केंद्राला पुस्तक खरेदी व इतर बाबींसाठी भरघोस तरतूद करण्यात आली. परंतु मागील चार वर्षांत निधी असूनदेखील केंद्राने पुस्तकखरेदीसाठी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. एप्रिल २०१८ पासून एकूण तरतुदीच्या ३४ टक्के रकमेचीच पुस्तक खरेदी झाली. मागील दोन वर्षांतील पुस्तक खरेदीची टक्केवारी तर केवळ ०.७ टक्के इतकी आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनंतर हे ज्ञानस्रोत केंद्र आहे की विद्यापीठ प्रशासनाचे ‘बचत केंद्र’ असा सवाल उपस्थित होत आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत या केंद्रासाठी झालेली अर्थसंकल्पीय तरतूद, एकूण खर्च, पुस्तकांची झालेली खरेदी यांबाबत विचारणा केली होती. ज्ञानस्रोत केंद्रातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१८-१९ ते २०२१-२२ या चार वर्षांच्या कालावधीत विद्यापीठाचा साधारण निधी व संशोधन प्रकल्प निधीतून पुस्तक खरेदीसाठी २ कोटी ६६ लाख ३० हजार ९५९ रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातील २ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपये साधारण निधीतून होते. एकूण निधीपैकी ज्ञानस्रोत केंद्राने ९१ लाख ६९ हजार ३७७ रुपयांची पुस्तके खरेदी केली. ही टक्केवारी अवघी ३४.४३ टक्के इतकी आहे. एकूण तरतुदीपैकी अर्ध्या निधीची पुस्तके खरेदीची तसदीदेखील घेण्यात आली नाही. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२२ या दोन वर्षांत १ कोटी ४२ लाख ३५ हजारांच्या तरतुदीपैकी केवळ ९१ हजार ३२२ रुपयांची पुस्तकखरेदी झाली.

एकूण खर्चातदेखील हात आखडताच

दरम्यान, २०१८-१९ ते २०२१-२२ या कालावधीत ज्ञानस्रोत केंद्रासाठी विद्यापीठातर्फे ३ कोटी ४५ लाख ६४ हजारांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली. मात्र त्यांपैकी केवळ ५२.९२ टक्के म्हणजेच १ कोटी ८२ लाख ९० हजार ५०१ रुपयांचा निधी खर्च झाला.

 

 

 

Web Title: Nagpur University's knowledge center became 'Bachat Kendra'; Despite having funds, he is reluctant to buy books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.