नागपूर विद्यापीठातील पेपर सेटर्सना २०१७ पासून मानधनच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:29 AM2019-07-09T11:29:52+5:302019-07-09T11:32:27+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागामध्ये मानधनाचा नवा घोळ उघडकीस आला आहे. २०१७ आणि त्यापूर्वीच्या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकांना मानधन देण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागामध्ये मानधनाचा नवा घोळ उघडकीस आला आहे. २०१७ आणि त्यापूर्वीच्या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकांना मानधन देण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या विभागाच्या रेकॉर्डवर मात्र संबंधित शिक्षकांना मानधन दिल्याची नोंद आहे.
प्राप्त माहितीनुसार, मागील अनेक वर्षांपासून मानधनाची रक्कम न मिळाल्याने अनेक शिक्षक विद्यापीठाच्या परीक्षा विभागासोबत वारंवार संपर्क करीत आहेत; मात्र कुणालाच ठोस उत्तर मिळत नसल्याने संभ्रमाची स्थिती आहे. संपर्ककर्त्या शिक्षकांना मानधन दिल्याचे सांगितले जात असून, त्यांच्या नावासमोर मानधनाची उचल केल्याचे दर्शवून स्वाक्षरीही दाखविली जात आहे. प्रत्यक्षात अनेकांना रक्कमच न मिळाल्याने यात घोळ असल्याचे दिसत आहे.मानधनाच्या रकमेसाठी संपर्क करणाऱ्या शिक्षकांना विद्यापीठाच्या परीक्षा विभागात येऊन रेकॉर्ड पाहून खातरजमा करण्यास सांगितले जात आहे. अनेक शिक्षक नागपूरबाहेरील असल्याने आणि विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकारी आपल्या भूमिके वर खंबीर असल्याने शिक्षकांनी मानधनाच्या विषयावर पाणी सोडले आहे. वारंवार फोनवरून संपर्क करणाऱ्या शिक्षकांचे कॉल उचलणेही अधिकाऱ्यांनी बंद केले आहे.
रेकॉर्ड दाखविण्यास टाळाटाळ
‘लोकमत’ने यासंदर्भात पडताळणी केली. गोपनीय शाखेतील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, सर्व शिक्षकांच्या मानधनाची रक्कम देण्यात आल्याचे सांगितले. मात्र रेकॉर्ड दाखविण्याचे त्यांनी टाळले. मानधनाची रक्कम मिळाली नसणाऱ्या शिक्षकांची नावे सांगितली असता रेकॉर्ड तपासून माहिती घेऊ, असे या अधिकाऱ्याने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठात शैक्षणिक पाठ्यक्रमांसह पीएचडीच्या नोंदणीसाठी पूर्व प्रवेश परीक्षा (पेट) घेतली जाते. या परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली जाते. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकांना प्रवासभत्ता, डीए आणि मानधन बँकेतील खात्यात जमा करून दिले जाते. मात्र २०१७ व त्यापूर्वीच्या मानधनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यांमध्ये जमा झालीच नाही. हा आकडा लाखो रुपयांच्या घरात असल्याने घोटाळ्याची शक्यता व्यक्त होत आहे.