नागपूर विद्यापीठाचा प्रताप : विद्यार्थ्यांना बंद झालेल्या अभ्यासक्रमाच्या पदव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 09:43 PM2019-06-13T21:43:21+5:302019-06-13T21:47:20+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर जनसंवाद (एमएमसी) अभ्यासक्रम २००९ मध्ये बंद करण्यात आला आहे. त्यानंतरही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या पदव्या दिल्या जात आहेत. पदवीमध्ये हा अभ्यासक्रम कोणत्या विद्याशाखेंतर्गत येतो हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर जनसंवाद (एमएमसी) अभ्यासक्रम २००९ मध्ये बंद करण्यात आला आहे. त्यानंतरही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या पदव्या दिल्या जात आहेत. पदवीमध्ये हा अभ्यासक्रम कोणत्या विद्याशाखेंतर्गत येतो हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘एम.ए. इन कम्युनिकेशन’ची पदवी देण्यात आली असून २०१६ व २०१७ मध्ये परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मात्र ‘एमएमसी’ची पदवी देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाला २०१६ मधील पदवीत ‘सोशल सायन्स’चा तर, २०१७ मधील पदवीत ‘इंटरडिसिप्लिनरी’ विद्याशाखेचा भाग दाखविण्यात आले आहे. तसेच, सर्व पदव्यांमध्ये ‘ग्रेड’ ऐवजी ‘सीजीपीए’चा उल्लेख करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, परीक्षा व विद्या विभाग याबाबत अनभिज्ञ आहे.
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अनिल हिरेखण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगितले. विद्याशाखेद्वारे पाठविण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारावर पदव्या तयार केल्या जातात. अशा परिस्थितीत डॉ. हिरेखण यांच्या उत्तराने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
२०१८ मध्येही एमएमसी पदवी
सूत्रांच्या माहितीनुसार, २०१८ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्याही एमएमसी अभ्यासक्रमाच्या पदव्या तयार करण्यात आल्या आहेत. या पदव्या अद्याप वाटप करण्यात आल्या नाहीत.
चौकशी केली जाईल
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगितले. तसेच, प्रकरणाची चौकशी केल्यानंतरच योग्य माहिती दिली जाऊ शकते असे स्पष्ट केले.