‘कॅग’च्या कार्यप्रणालीवर नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून प्रहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 09:06 PM2018-10-25T21:06:20+5:302018-10-25T21:10:07+5:30
‘कॅग’च्या (कॉम्प्ट्रोलर अॅन्ड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया) अहवालात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले होते. मात्र संबंधित अहवालावरच नागपूर विद्यापीठाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यापीठाला अहवालाची प्रत मिळाली नसून ‘कॅग’ने अयोग्य आकडेवारी जाहीर केली आहे, असा दावा नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कॅग’च्या (कॉम्प्ट्रोलर अॅन्ड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया) अहवालात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले होते. मात्र संबंधित अहवालावरच नागपूर विद्यापीठाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यापीठाला अहवालाची प्रत मिळाली नसून ‘कॅग’ने अयोग्य आकडेवारी जाहीर केली आहे, असा दावा नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केला.
‘कॅग’तर्फे ३१ मार्च २०१७ रोजी संपलेल्या वर्षाचा अहवाल राज्य विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सादर करण्यात आला होता. ‘कॅग’ने २०१२-१३ ते २०१६-१७ या कालावधीची तपासणी करण्यासाठी जानेवारी ते जून २०१७ दरम्यान लेखापरीक्षण केले होते. नागपूर विद्यापीठ निधीच्या आर्थिक व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात उणिवा असून अनेक बाबींमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ‘कॅग’तर्फे ठेवण्यात आला आहे. विद्यापीठ विभाग, परीक्षा केंद्र, कर्मचारी इत्यादींना देण्यात आलेल्या अग्रिमाच्या रकमेपैकी ७० कोटी ९० लाख रुपयांची रक्कम अद्यापही असमायोजित आहे. यातील काही अग्रिम रकमेचे समायोजन तर १९८८ पासून प्रलंबित आहे. असा स्थितीत या निधीची अफरातफर होण्याची शक्यता ‘कॅग’तर्फे वर्तविण्यात आली. ‘कॅग’ने विद्यापीठाच्या विविध धोरणांवर ताशेरे ओढत महाविद्यालय संलग्नीकरण प्रक्रियेतील घोळ, शिक्षणप्रणाली, संशोधनातील माघारलेपणा इत्यादींवर अहवालातून बोट ठेवले होते.
विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत अजित जाचक यांनी गुरुवारी ठराव मांडला होता. २०१२ ते २०१७ या कालावधीत ‘कॅग’ने विद्यापीठात केलेल्या लेखापरीक्षणाचा अहवाल अधिसभेसमोर ठेवण्यात यावा या आशयाचा हा ठराव होता. परंतु विद्यापीठाला अद्यापपर्यंत हा अहवालच प्राप्त झाला नसल्याचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले. नियमांनुसार विद्यापीठाला अगोदर ‘कॅग’चा अहवाल पाठविणे बंधनकारक होते. मात्र अद्यापपर्यंत आम्हाला अहवाल मिळालेला नाही, असे कुलगुरूंनी सभागृहाला सांगितले.
‘कॅग’च्या चमूवरच प्रश्नचिन्ह
‘कॅग’ने अहवालात दिलेली माहिती चूक असून अयोग्य आकडेवारी सादर करण्यात आल्याचा दावा यावेळी कुलगुरूंनी केला. विद्यापीठाची पाहणी करायला आलेल्या ‘कॅग’च्या चमूने प्राथमिक अहवालात चुकीचे आकडे दिले होते. आम्ही त्याला आक्षेप घेत ‘एक्झिट मिटींग’मध्ये कागदपत्रे व पुराव्यांनिशी सुधारणा सुचविल्या होत्या. तरीदेखील विद्यापीठाबाबत चुकीची माहिती अहवालात देण्यात आली. सुधारित अहवाल न बनवता जुनाच अहवाल विधिमंडळासमोर सादर करण्यात आला, असे कुलगुरूंनी सांगितले.