नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुढे ढकलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 09:21 AM2021-04-21T09:21:29+5:302021-04-21T09:23:03+5:30
Nagpur news राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हिवाळी परीक्षा पोस्टपोन केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हिवाळी परीक्षा पोस्टपोन केल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुमारे १२ अभ्यासक्रमांचा यात समावेश असून, हजारो विद्यार्थ्यांना यामुळे परीक्षेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विद्यापीठाच्या ऑनलाईन हिवाळी परीक्षेला मार्च महिन्यात सुरुवात झाली. बीएस्सी प्रथम सत्र, बीसीसीए प्रथम सत्र, बीए प्रथम सत्र व बीए एलएलबी तृतीय सत्र यासारख्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार होती. मात्र अचानकपणे कोरोनाबाधितांची संख्या वाढीस लागली असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी होत होती. अनेक महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी किंवा त्यांच्या नातेवाईकांना संसर्ग झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र वितरणातदेखील अडथळे येत होते. अशास्थितीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलाव्या, अशी मागणी विधिसभा सदस्य मनमोहन बाजपेयी यांनी केली होती.
विद्यापीठात यासंदर्भात बैठक झाली व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. १२ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पोस्टपोन झाल्या आहेत. नवीन वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले.
अभियांत्रिकीबाबत निर्णय कधी?
अभियांत्रिकीच्या प्रथम सत्राची परीक्षा ११ मेपासून सुरू होणार आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील २० हजाराहून जास्त आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलली जाणार की नियोजित वेळापत्रकानुसारच होणार, हे स्पष्ट झालेले नाही.
या परीक्षा पोस्टपोन
- बीसीए (प्रथम सत्र)
- बीएस्सी (प्रथम सत्र)
- बीएस्सी-आयटी (प्रथम सत्र)
- बीएस्सी-गृहविज्ञान (प्रथम सत्र)
- बी.आर्क. (तृतीय सत्र)
- बी.सी.टी. (प्रथम सत्र)
- बी.बी.ए. (प्रथम सत्र)
- बी.सी.सी.ए. (प्रथम सत्र)
- बीकॉम (प्रथम सत्र)
- बीए (प्रथम सत्र)
- बीएसडब्ल्यू (प्रथम सत्र)
- बीए-एलएलबी (पाच वर्ष) (तृतीय सत्र)