नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा संकटात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 10:51 PM2018-06-14T22:51:14+5:302018-06-14T22:51:34+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांसमोर एक वेगळेच संकट उभे ठाकले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी महाविद्यालयांनी खर्चाची रक्कम वाढविण्याची मागणी केली आहे. जर ही रक्कम वाढविली नाही तर परीक्षा घेण्यास महाविद्यालये असमर्थ राहतील, अशी भूमिका प्राचार्य फोरमतर्फे घेण्यात आली आहे तर कुलगुरुंनी ही मागणीच फेटाळून लावली आहे. त्यामुळे पुढील कालावधीत विद्यापीठ व प्राचार्य फोरम नेमके काय पाऊल उचलतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांसमोर एक वेगळेच संकट उभे ठाकले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी महाविद्यालयांनी खर्चाची रक्कम वाढविण्याची मागणी केली आहे. जर ही रक्कम वाढविली नाही तर परीक्षा घेण्यास महाविद्यालये असमर्थ राहतील, अशी भूमिका प्राचार्य फोरमतर्फे घेण्यात आली आहे तर कुलगुरुंनी ही मागणीच फेटाळून लावली आहे. त्यामुळे पुढील कालावधीत विद्यापीठ व प्राचार्य फोरम नेमके काय पाऊल उचलतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
नागपूर विद्यापीठाकडून परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकेची ‘आॅनलाईन डिलिव्हरी’ करण्यात येते. प्रश्नपत्रिकांच्या प्रती काढण्यासाठी लागणारा खर्च जास्त असून विद्यापीठाकडून मिळणारा निधी महाविद्यालयांना अपुरा पडतो आहे, अशी प्राचार्यांची तक्रार आहे. यासंदर्भात प्राचार्य फोरमने विद्यापीठासमोर अगोदरदेखील मुद्दा मांडला होता व विद्यापीठाने खर्चाची रक्कम वाढवून देण्याचे आश्वासनदेखील दिले होते. मात्र याची अंमलबजावणी झाली नसल्याचे प्राचार्य फोरमतर्फे सांगण्यात आले. जर खर्चाची रक्कम वाढवून देण्यात आली नाही तर हिवाळी २०१८ च्या परीक्षा घेण्यास महाविद्यालयांना अडचण होईल व परीक्षा घेण्यासाठीच महाविद्यालये असमर्थ राहतील, असे प्राचार्य फोरमने कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेऊन स्पष्ट केले.
कुलगुरूंनी फेटाळली मागणी
दरम्यान, ‘प्राचार्य फोरम’ने केलेली ही मागणी कुलगुरूंनी फेटाळून लावली. परीक्षा काळात परीक्षा केंद्रांना स्टेशनरी आणि इतर खर्चासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त निधी देण्यात येतो. त्यामुळे त्यात वाढ करण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.