नागपूर विद्यापीठाचा 'युवारंग' १९ मार्चपासून'; सहभागी होण्यासाठी १५ तारखेची मुदत

By आनंद डेकाटे | Published: March 10, 2024 03:11 PM2024-03-10T15:11:21+5:302024-03-10T15:12:03+5:30

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने हा युवक महोत्सव घेण्यात येणार आहे. यामध्ये संगीत, नृत्य, नाटक, साहित्य व ललित कला विषयाशी संबंधित विविध स्पर्धा होणार आहे.

Nagpur University's 'Yuvarang' from March 19'; 15th deadline to participate | नागपूर विद्यापीठाचा 'युवारंग' १९ मार्चपासून'; सहभागी होण्यासाठी १५ तारखेची मुदत

नागपूर विद्यापीठाचा 'युवारंग' १९ मार्चपासून'; सहभागी होण्यासाठी १५ तारखेची मुदत

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या वतीने 'युवारंग २०२४' या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आयोजन १९ ते २२ मार्चदरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ मार्चपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने हा युवक महोत्सव घेण्यात येणार आहे. यामध्ये संगीत, नृत्य, नाटक, साहित्य व ललित कला विषयाशी संबंधित विविध स्पर्धा होणार आहे. या महोत्सवात वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. स्पर्धांमधील सहभागासाठी संबंधित महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची निवड करून त्याबाबतची माहिती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडे १५ मार्चपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. प्रत्येक महाविद्यालयाची एक चमू या महोत्सवात सहभागी होऊ शकेल. ही स्पर्धा विद्यापीठाच्या गुरुनानक भवन येथे होईल. विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर, ११ वाजतापासून स्पर्धांना प्रारंभ होईल. पहिल्या दिवशी सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, समूह गीत, शास्त्रीय तालवाद्य आणि ताणवाद्य स्पर्धा होतील. २० मार्च रोजी वादविवाद, प्रश्नमंजूषा, वेस्टर्न सोलो, वेस्टर्न इन्स्ट्रुमेन्टल, चित्रकला, पोस्टर मेकिंग, क्ले मॉडेलिंग, व्यंगचित्र, कोलाज आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, २१ मार्च रोजी लघुनाटिका, मूकनाट्य, नकला, भारतीय शास्त्रीय नृत्य या कलाप्रकारांच्या स्पर्धा घेण्यात येतील. २२ मार्च रोजी होणाऱ्या स्पर्धांमध्ये लोकनृत्य आणि लावणी या प्रकारांचा समावेश आहे. महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ याच दिवशी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

Web Title: Nagpur University's 'Yuvarang' from March 19'; 15th deadline to participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.