नागपूर उद्यापासून अनलॉक; पण काही निर्बंधही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:33+5:302021-06-06T04:06:33+5:30
आढावा बैठकीत ठरणार रणनीती, आज होणार घोषणा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कोविडच्या पार्श्वभूमीवर ...
आढावा बैठकीत ठरणार रणनीती, आज होणार घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांमध्ये सोमवारपासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरचा विचार केला, तर येथे पॉझिटिव्हिटी रेट : ३.८६ टक्के आणि ८.१३ टक्के ऑक्सिजन बेडचा वापर होत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार नागपूर या आकडेवारीच्या आधारावर लेव्हल १ च्या श्रेणीमध्ये येते. या श्रेणीच्या जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारचे निर्बंध हटविण्यात आले आहेत. असे असले तरी यासंदर्भातील अंतिम निर्णय जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच केला जाईल. यातच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे की, सोमवारपासून नागपूर अनलॉक होणार; परंतु पुन्हा संक्रमण वाढू नये, यासाठी काही निर्बंधसुद्धा राहतील.
प्रशासनाशी संबंधित सूत्रांनुसार आकडेवारी नागपूर अनलॉक करण्याच्या बाजूने असले तरी जुने अनुभव लक्षात घेता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे बाजार उघडल्यामुळे गर्दी होणार नाही, सुरक्षित अंतर व मास्कचा वापर बंधनकारक राहणे आवश्यक आहे. नागपूर हे लेव्हल १ च्या श्रेणीमध्ये येत असले तरी प्रशासन येथे लेव्हल ३ च्या श्रेणीनुसार सूट देण्याच्या तयारीत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे; परंतु यावर अंतिम निर्णय रविवारी बैठकीनंतरच घेण्यात येईल. मॉल व सिनेमागृह उघडण्याचा निर्णयसुद्धा आढावा बैठकीनंतरच घेेण्यात येईल.
बॉक्स
लेव्हल १ मध्ये सर्वाधिक सवलत
राज्य सरकारच्या नियमावलीनुसार नागपूर लेव्हल १ च्या श्रेणीमध्ये येत आहे. या श्रेणीतील जिल्ह्यांमध्ये मॉल, सिनेमागृहासह सर्व उघडता येणार आहे. अशा परिस्थितीत नागपुरात सर्व काही पूर्वीसारखे होणे अपेक्षित आहे. लेव्हल २ मध्ये मॉल ५० टक्के क्षमतेने उघडले जातील. उर्वरित सर्व दुकाने सुरू राहतील. लेव्हल ३ मध्ये सर्व दुकाने व खासगी कार्यालये दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. मॉल बंद राहील. लेव्हल ४ मध्ये केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी राहील. लेव्हल ५ मध्ये कडक निर्बंध राहील. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या श्रेणीचा राज्यात एकही जिल्हा नाही.
बॉक्स
सर्व बाबींवर चर्चेनंतरच निर्णय - पालकमंत्री
पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले की, रविवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व बाबींवर विचार केला जाईल. कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत; परंतु कोरोना अजूनही समाप्त झाला नाही. अशा परिस्थितीत अनलॉकमुळे गर्दी
वाढणार नाही, याचा विचार केला जाईल.
बॉक्स
गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण असावे - महापौर
महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की, अनलॉक करताना अनुशासन तुटणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. सुरक्षित अंतर व मास्कचा वापर हे काटेकोरपणे व्हावे. मॉल, सिनेमागृह यासारखी गर्दी होणारी ठिकाणे अजूनही सात-आठ दिवस बंद ठेवायला हवीत. सलून आणि घर चालविण्यासाठी ब्युटी पार्लरला मात्र परवानगी द्यायला हवी.