प्रचंड उकाड्याने त्रासलेल्या वैदर्भीयांना मान्सूनची प्रतीक्षा
By निशांत वानखेडे | Published: June 9, 2024 09:31 PM2024-06-09T21:31:26+5:302024-06-09T21:31:44+5:30
पूर्वमाेसमी पावसाची हुलकावणी : १२ जूनपर्यंत करावीच लागेल प्रतीक्षा
नागपूर : पूर्व माेसमी पावसाचा अंदाज असताना पावसाळी गारव्याऐवजी प्रचंड उकाड्याने बेहाल झालेल्या वैदर्भीयांचे डाेळे आकाशाकडे लागले आहेत. मुंबईपर्यंत माेसमी आणि पुण्यापर्यंत पूर्वमाेसमी पावसाने जाेरदार हजेरी लावली असताना, विदर्भात आकाशात जमलेले ढग सातत्याने हुलकावणी देत असल्याने एकदा पाऊस पडेल व उष्णतेपासून दिलासा मिळेल, अशी काहीशी अवस्था झाली आहे.
यंदा माेसमी पावसाचे दरवर्षीपेक्षा लवकर आगमन देशात झाले. मान्सून अरबी समुद्रापर्यंत धडकला व ही शाखा अधिक सक्रिय हाेत महाराष्ट्राच्या किणारपट्टीवर पाेहचली. मुंबई, काेकणात जाेरदार माेसमी पावसाचा अंदाज आहे. या काळात पूर्वमाेसमी पाऊस विदर्भातही जाेरदार हजेरी लावेल, असा अंदाज हाेता. मात्र गेल्या चार दिवसांपासून नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्हे भयंकर उकाड्याचा सामना करीत आहेत. विशेष म्हणजे आकाश ढगांनी व्यापलेले आहे व काही भागात तुरळक पाऊसही झाला. मात्र त्याने उकाड्यापासून दिलासा दिला नाही. तडपणारा सूर्य व ढगांचे बाष्प यांच्या संयुगाने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवते. ४० अंशावर असलेला पारा ४३ अंशाची जाणीव करताे.
रविवारी नागपूरचा पारा २ अंशाने घटत ३९.६ अंशावर आला. मात्र उकाडा ४१ अंशाप्रमाणे जाणवत हाेता. अकाेला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात तापमान ४० अंशाच्यावर कायम आहे. त्यामुळे ढग असूनही त्याचा फायदा नागरिकांना नाही.